पेटत्या निखाऱ्यांमुळे आग लागून कुटुंबाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. काही ठिकाणी पारा 4 अंशापर्यंत घसरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटी, निखारे अशा पर्यायांचा वापर करतात. पण, जीवघेण्या थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच जिवावर उठल्याचा प्रकार फरिदाबाद येथे घडला आहे.

फरिदाबाद येथील वजीरपूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील एका कुटुंबाचा खाटेखाली पेटते निखारे ठेवून झोपल्यामुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मृत्यू झाला आहे. गजेंद्र असं या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. गजेंद्र, त्याची पत्नी आणि आठ वर्षांची मुलगी हे तिघेही कडाक्याच्या थंडीत गारठून गेले होते. उब मिळावी म्हणून झोपण्यापूर्वी त्यांनी खाटेखाली पेटते निखारे ठेवले होते. पण, या निखाऱ्यांनी आग लागली आणि हे तिघेही होरपळून मृत्युमुखी पडले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत गजेंद्र याने घराचा दरवाजा उघडला नाही. इतका वेळ भावाने घरचा दरवाजा बंद ठेवल्याने चिंतेत पडलेल्या गजेंद्रचा भाऊ रवींद्र याने खिडकी फोडून दरवाजा उघडला. तेव्हा तिथे खोलीत गजेंद्र त्याच्या कुटुंबासह मृतावस्थेत आढळला. ते दृश्य पाहून रवींद्रची शुद्घ हरपली. मात्र, थोड्यावेळाने शुद्धीवर येऊन त्याने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.