
लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या मनमानीविरोधात घराघरांत आंदोलनाचा वणवा पेटला आहे. नागरिकांनी 12 तासांचे उपोषण सुरू केले आहे. घरांबरोबरच काही लोक समुद्रातही निदर्शने करत आहेत. पटेल यांच्या मोगलाईविरोधात 93 माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांनी गेल्या आठवडय़ात एक तुघलकी फर्मान जारी करून बीफ खाण्यास मनाई केली. एवढेच नाही तर दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यास मनाई करण्यात आली. भूसंपादन, कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली लोकांच्या अटकेला परवानगी देण्यात आली. कायद्याचा हा मसुदा तयार करण्यात आला असून केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
























































