
सामना ऑनलाईन | डोंबिवली
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही शहरातील 500 चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी मुंबई महापालिकेने केल्यानंतर राज्य सरकारने हा मालमत्ता कर रद्द केला आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळात याबाबतच्या विधयेकाला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे 18 लाख कुटुंबांवरील कराचा बोजा कमी होणार आहे. हा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्यातील आर्थिकदृष्टय़ा सक्षम पालिकांनी मालमत्ता कर रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना सरकार सहकार्य करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याच धर्तीवर कल्याण आणि डोंबिवली शहरातील 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांचाही मालमत्ता कर रद्द करण्यात यावा. यासाठी आवश्यक असलेले सहकार्य प्रशासनाने करावे. मालमत्ता कर रद्द करण्याचा प्रस्ताव महापौर विनिता राणे यांनी लवकरात लवकर महासभेत आणून तो मंजूर घ्यावा आणि शासनाकडे पाठवावा, अशी मागणी शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केली आहे. कल्याण आणि डोंबिवली शहरातील 500 चौरस फुटांपर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द झाला तर हजारो कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होणार आहे, असेही मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
























































