बंदी असताना अल्पवयीन मुलाला दारू विकलीच कशी ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ब्रिजमोहन पाटील,पुणे
वडगाव येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या अल्पवयीन मुलांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. दारू विकत आणल्यानंतर उरलेले पैसे परत मागण्यावरून हा खून केल्याचे समोर आले. मात्र, धायरी फाटा येथील एका वाइन शॉपचालकाने या अल्पवयीन मुलाला दारू विकलीच कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून दुकानदारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून दारूविक्री होत असल्याने शहरात गुन्हेगारीला ऊत आला आहे. 
सिंहगड पोलिसांना १४ जानेवारी रोजी सिंहगड रस्त्यावर कॅनॉलच्या खड्ड्यात कुजलेला मृतदेह आढळला. त्याचा तपास केला असता, त्यात तीन  शाळकरी मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावर कॅनॉलच्या पुलाखाली सिमेंटचा कठडा आहे. तेथे ६ जानेवारीला गुड्ड्या दारू पिण्यासाठी गेला. दोन दिवसांपूर्वी त्याची ओळख झालेला १५ वर्षांचा मुलगा तेथे आला होता. त्याला रमची छोटी बाटली आणण्यासाठी २०० रुपये दिले होते. या मुलाने धायरी फाटा येथे असलेल्या एका वाइन शॉपमधून रमची छोटी बाटली घेतली. उर्वरित ७०-८० रुपये या मुलाने परत न केल्याने त्याची आणि या मुलांशी वादावादी झाली. त्यातूनच या तिघांनी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. 
मुळात २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना किंवा ग्राहकांना दारू विकण्यास, पिण्यास बंदी आहे. असे असतानाही ओळखपत्र किंवा दारू पिण्याचा परवाना याची कोणतीही चौकशी न करता थेट दारूविक्री करण्यात आल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. एका वाइन शॉपचालकाने या १५ वर्षांच्या मुलाला दारू देण्यास नकार दिला असता तरी हा गुन्हा टळला असता. 
 
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे म्हणाले, नियमानुसार लहान मुलांना दारूविक्री करता येत नाही. त्यामुळे अवैध पद्धतीने दारू विक्री केली गेली असल्याने संबंधितांवर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक पुâलपगारे म्हणाले, २१ वर्षांच्या आतील व्यक्तीला दारू विकता येत नाही. सिंहगड रस्ता पोलिसांकडे घडलेल्या गुन्ह्याची माहिती मिळाली तर आम्ही संबंधित दुकानचालकावर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले. 
 
दोन-तीन वर्षांपासून मुलांना दारूचे व्यसन
ह पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिन्ही अल्पवयीन मुले गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दारू पीत होती. आई-वडील दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्याने या मुलांना मोकळे रान मिळाले होते.  त्यांच्या या व्यसनाबाबत त्यांना पुसटशी कल्पना मिळाली होती. यातील एकजण धायरी फाटा येथील शाळेत शिकत आहे. दुसरा बाजीराव रस्त्यावरील शाळेत, तर तिसरा टिळक रस्त्यावरील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होता, असे पोलिसांनी सांगितले.