कृत्रिम नखे लावताय: मग काळजी घ्या..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्टिफिशीयल नेल्स किंवा कृत्रिम नखे तुम्हाला स्टायलिश दिसण्यात मदत करू शकतात. हल्ली कृत्रिम नखे लावण्याचा ट्रेंड आहे. या नेल्सवर तुम्ही विविध प्रकारचे नेल आर्ट करू शकता. सुंदर ग्रूम केलेल्या नखांमुळे हातांचे सौंदर्य वाढते. जर तुमची खरी नखे नीट वाढत नसतील किंवा ती नाजूक असतील तर तुम्ही कृत्रिम नखांचा पर्याय वापरून बघू शकता. हल्ली विविध प्रकारची कृत्रिम नखे मिळतात. कृत्रिम नखे वापरणे हानीकारक नसले तरी, ती बोटांना लावणे आणि काढणे यामध्ये ऍसिड आणि इतर रसायनांशी आपला संपर्क येतो ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. कृत्रिम नखे खराब झाली तर त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते किंवा बोटांच्या त्वचेला इतर समस्या होऊ शकतात. .

कृत्रिम नखांचे प्रकार जाणून घ्या
कृत्रिम नखांचे प्रामुख्याने ऍक्रेलिक आणि जेल असे दोन प्रकार असतात. तसेच सिल्क हा तिसरा प्रकार अनेकदा खराब झालेली नखे दुरुस्त करण्यासाठी किंवा नखे ​​मजबूत करण्यासाठी वापरला जातो. सध्या ऍक्रेलिक हा प्लास्टिकसदृश प्रकार सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. एका विशिष्ट प्रकारच्या पावडरमध्ये द्रव मिसळून नंतर हे मिश्रण चिकटवलेल्या कृत्रिम नखांच्या टोकावर ब्रशच्या साहाय्याने लावले जाते तेव्हा त्याचे एक कठीण कवच तयार होते.. तुम्हाला ऍक्रेलिक नखे लावायची असतील तर त्याआधी तुमची नैसर्गिक नखे फाईल करून पुरेशी खडबडीत बनवावी लागतील जेणे करून ऍक्रेलिक नखे त्यावर नीट बसतील. जेलची कृत्रिम नखे ऍक्रेलिकपेक्षा जास्त महाग असतात आणि जास्त काळ टिकतात. नेहमीच्या नेलपॉलिशप्रमाणे जेल तुमच्या नखांना लावा आणि नंतर जेल कडक करण्यासाठी नखे अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशाखाली ठेवा. याप्रकारे तुम्ही कृत्रिम नखे लावून घेऊ शकता.

कृत्रिम नखांमुळे होऊ शकणाऱ्या समस्या
ऍक्रेलिक नेल्स लावली तरी तुमची खरी नखे सतत वाढत असल्याने, तुम्हाला तुमचे क्यूटिकल आणि ऍक्रेलिक नखे यांच्यात एक गॅप दिसेल. ही गॅप भरण्यासाठी तुम्हाला दर 2-3 आठवड्यांनी नेल सलूनमध्ये परत जावे लागेल किंवा स्वतः फिलर लावावे लागेल. घरच्या घरी सुद्धा ऍक्रेलिक नखं काढता येऊ शकतात. परंतु फिलिंग आणि फाइलिंग करताना जी रसायने वापरली जातात त्यामुळे तुमची खरी नखे कमकुवत होऊ शकतात. तसेच तुम्हाला आधीपासूनच नखांना फंगल इन्फेक्शन असल्यास कृत्रिम नखांमुळे ते वाढू शकते. जेल सुकवताना UV लाइटमुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडून त्वचेचे नुकसान होऊ शकते. अतिनील प्रकाशामुळे त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो. तसेच कृत्रिम नखे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी रसायने तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या नखांभोवती लालसरपणा किंवा सूज दिसू शकते व इन्फेक्शन झाल्यास नखांमध्ये पस होऊ शकतो. कृत्रिम नखे एखाद्या गोष्टीत अडकल्यास किंवा आपटली गेल्यास ती अर्धवट तुटू शकतात आणि त्या गॅपमधून जंतू, यीस्ट किंवा फंगस प्रवेश करू शकतात आणि त्यांची त्या गॅपमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे तुमच्या नखांना संसर्ग होऊ शकतो.

नखे कमकुवत होऊ शकतात
ऍक्रेलिक किंवा जेल नखे काढण्यासाठी, आपल्याला बोटे ऍसिटोनमध्ये बुडवून ठेवावी लागतात.. हे रसायन तुमच्या खऱ्या नखांसाठी चांगले नाही कारण यामुळे आपली नखे खूप कोरडी होतात आणि त्वचेलाही त्रास होऊ शकतो. नैसर्गिक नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. जर तुम्हाला पूर्वी नेल फंगसचा त्रास झाला असेल तर कृत्रिम नखांपासून दूर रहा. LED लाइटसह जेल पॉलिश कडक करणारे सलून निवडा, ज्यामध्ये कमी प्रमाणात UV प्रकाश असेल. तसेच त्या लाईटखाली हात ठेवण्यापूर्वी तुमच्या हातांना ब्रॉड-स्पेक्ट्रम (UVA/UVB) सनस्क्रीन लावा. दर दोन महिन्यांनी कृत्रिम नखांपासून ब्रेक घ्या.

आर्टिफिशियल नेल्सची आवड असल्यास जरूर त्यांचा वापर करा पण त्याबरोबरच स्वतःच्या नैसर्गिक नखांचीही काळजी घ्या

नखं वाढवण्याचे १० घरगुती उपाय
1) नारळाचं तेल तुमची केवळ त्वचा आणि केसच नाही तर नखांसाठीदेखील फायदेशीर असतं. त्यासाठी पाव कप नारळ तेल घ्यावं त्यात पाव कप मध आणि ४ थेंब रोझमेरी तेल घालून मिक्स करावं. हे मिश्रण थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर नखं १५ ते २० मिनिट्स या तेलामध्ये बुडवून बसावं. आठवड्यातून असं २ वेळा केल्यास, नख वेगाने वाढतात आणि मजबूतही होतात.

2) दूध आणि अंडं हे दोन्ही पदार्थ हाडं मजबूत करतात. त्यामुळे याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर असतंच पण त्यासह तुम्ही याचा वापर नखांची मजबूती वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एका अंड्याचा सफेद भाग दुधामध्ये घालून फेटायचं आहे आणि यामध्ये ५ मिनिट्स तुमची नखं बुडवून ठेवा. आठवड्यातून २-३ वेळा असं केल्यामुळे तुमच्या नखांना मजबूती मिळेल आणि वेगाने नखं वाढतील.

3) लसणाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर नखांचं पोषण आणि वाढीसाठीदेखील होऊ शकतो. लसणाची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा नखांवर लावल्यामुळे नखांना आवश्यक असणारं पोषण मिळतं.

4) नखं वाढण्यासाठी विटामिन सी खूपच फायदेशीर असतं. संत्र्यामध्ये विटामिन सी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यासाठी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिट्स नखं बुडवून ठेवावी. त्यानंतर अगदी हलक्या गरम पाण्याने नखं धुऊन त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

5) त्याचप्रमाणे १ चमचा लिंबू रसामध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर १० मिनिट्स नखं यामध्ये बुडवून ठेवावीत. तुम्ही रोज जरी हे करू शकत असाल तर लिंबाचे तुकडे नखांवर घासावेत. असं केल्यास, नखं पटकन वाढतात.

6) नखांची चांगली वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलाचं मालिशदेखील चांगलं असतं. आठवड्यातून एक दिवस १५ ते २० मिनिट्स नखांचे मालिश करावे. असं केल्यास, नखांची वाढ लवकर होते.

7) बदामाचे तेलदेखील फायदेशीर असते. तसंच बदामाचं तेल नखांवर लावून मसाज केल्यास, ब्लड सर्क्युलेशनदेखील वाढतं. त्यामुळे नखं वाढण्यास मदत होते. त्यासाठी रात्री रोज बदाम तेल लावून नखांचा मसाज करावा.

8.)अर्धा कप टोमॅटोच्या रसात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून आपल्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावे. दिवसातून दोन वेळा असं करावं.

9) नखं चांगली वाढण्यासाठी टूथपेस्टचा वापरही करण्यात येतो. यासाठी तुम्हाला टूथपेस्ट तुमच्या नखांवर घासावी लागेल. टूथपेस्ट घासल्यामुळे नखांवर पिवळेपणा निघून जाईल.

10) एक चमचा लसूण वाटून घ्यावी त्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घालावं. हे मिश्रण तुमच्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावं. त्यानंतर पाण्याने हात साफ करावे.

अशी घ्यावी नखांची काळजी
1) नखांना रोज नेलपॉलिश लावू नका. असं केल्यामुळे नखं पिवळी पडण्याबरोबरच कमजोर होतात आणि लवकर तुटतात.

2) नेलपॉलिश काढण्यासाठी नखांवर कुरतडू नका. केवळ चांगल्या दर्जाच्या रिमूव्हरनेच नेलपॉलिश साफ करा. त्याशिवाय नेलपॉलिश साफ केल्यानंतर लगेच दुसरं नेलपॉलिश लावू नका. नखांनाही काही काळ श्वास घ्यायला वेळ द्या.

3) कपडे धुणे, भाज्या कापणे, भांडी घासणे यासारख्या कामांमध्ये नखं कमजोर होतात आणि लगेच तुटतात. हार्ड साबण आणि पावडर या दोन्हीमुळे देखील नखांना नुकसान पोचते. त्यामुळे ग्लव्ह्ज घालून काम करणं सोयीस्कर ठरेल.

4) नखांना वेळोवेळी ट्रीम करत राहायला हवं. केवळ नेलकटरच्या मदतीनेच नखं कापावीत. घाईघाईत चाकू वा कात्रीचा वापर करण्याची चूक करू नये. त्याने केवळ नखांना आकारच बिघडतो असं नाही तर, तुम्हाला जखम होण्याचीही भीती असते.

5) नख वेळोवेळी साफ करावीत आणि धूळ अथवा मातीपासून संपर्कात येण्यापासून स्वतःला वाचवावं

6. तुम्हाला नख चावण्याची सवय असल्यास, ही सवय लवकरात लवकर सुटेल याकडे लक्ष द्या.

खराब नख साफ करण्याच्या पद्धती
बऱ्याचदा आपण नखं तर वाढवतो मात्र त्यांना साफ करताना नाकी नऊ येतात. परिणामी आपल्या नखांमध्ये किटाणू होतात, जे शरीरात जाऊन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. नखं साफ करण्यासाठी सारखंसारखं पार्लरमध्ये जाऊन मेनीक्युअर करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरीदेखील तुमच्या लांब नखांची काळजी घेऊन साफ करू शकता.

त्यासाठी तुम्ही पेपर फायलरने नखांमधील साचलेली घाण हलक्या हाताने साफ करावे. त्यानंतर गरम पाण्यात हात घालून नखांना टूथब्रश अथवा नेलब्रशच्या मदतीने स्क्रब करावे. त्यानंतर हाताला साबण लावून चांगले हात धुवावे आणि टॉवेलने नीट पुसून हात सुकवावे. आता एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन कमीत कमी ५ मिनिट्स नखं बुडवून ठेवावीत. त्यानंतर हात बाहेर काढून पुन्हा एकदा नीट साफ करावेत. आता हात सुकवून त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

नखं वाढवण्यासाठी काय खावे ?
नखं स्वस्थ, चमकदार आणि लांब ठेवण्यासाठी तुमचं खाणं – पिणं अगदी योग्य असणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीरामध्ये विटामिन्सची आवश्यकता असते.

1) विटामिन ए शरीरातील हाडं, दात आणि नखांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी द्राक्ष, दूध, गाजर, पालक, सफरचंद, अंड अथवा मासे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता.

2) नखांच्या वाढीसाठी विटामिन बी९ देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्यासाठी तुमच्या आहारामध्ये विटामिन बी९ चे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. भाजी, अंड, बीट आणि आंबट फळांसारख्या खाद्यपदार्थांपासून विटामिन बी९ मिळवू शकता.

3) नखं मजबूत करण्यासाठी शरीराला विटामिन सी अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही ब्लूबेरी, संत्रं, लिंबू, टॉमेटो, मोहरी आणि स्ट्रॉबेरी यांचा खाण्यात समावेश करावा.

4) विटामिन एच चे मुख्य काम आपले केस आणि त्वचेचे सेल्स सुरक्षित ठेवणं आहे. चांगल्या नखांसाठी रोज केळं आणि एवाकाडो आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करून घ्यावं.