कॉम्प्युटरची मागणी घटल्याने HP तील 6,000 कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार; Intel चेही कपातीचे संकेत

HP computer

हेवलेट-पॅकार्ड (HP) 2025 आर्थिक वर्षाच्या अखेरीस 6,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकू शकते, ज्यामुळे त्यांची कर्मचारी संख्या अंदाजे 12% कमी होईल, असे कॉम्प्युटर निर्माती कंपनीने मंगळवारी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बाजारात मंदीचे सावट असल्याचे वृत्त आले आहे. त्याचा सामना करण्यासाठी, HP ने 4,000 ते 6,000 नोकर्‍या कमी करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीत सध्या सुमारे 50,000 कर्मचारी आहेत.

HP ला अपेक्षा आहे की त्याच्या उत्पादनाची व्यावसायिक आणि ग्राहक मागणी आणखी कमी होऊ शकते आणि पहिल्या तिमाहीत कमी नफ्याचा अंदाज आहे. ‘आम्ही FY’22 मध्ये पाहिलेली आव्हाने FY’23 मध्ये चालू राहण्याची शक्यता आहे’, असे HP चे मुख्य वित्तीय अधिकारी, मेरी मायर्स, म्हटले होते.

वैयक्तिक कॉम्प्युटरच्या मागणीच्या अभावामुळे इंटेल कॉर्पवर देखील परिणाम झाला आहे, ते देखील मोठी कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहेत, असे वृत्त येत आहे. चिपमेकर कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांची संख्या काही हजाराने कमी करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. इंटेलकडे या वर्षी जुलैपर्यंत 1,13,700 कर्मचारी आहेत.

कंपनी विक्री आणि विपणन गटासह काही विभागांमध्ये सुमारे 20% कर्मचारी कमी करू शकते. पीसी प्रोसेसरच्या मागणीत मोठी घट होत आहे, जो त्याचा मुख्य व्यवसाय आहे. Advanced Micro Devices Inc सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून गमावलेला बाजारातील वाटा परत मिळवण्यासाठी ते धडपडत आहेत. जुलैमध्ये इंटेलने चेतावणी दिली होती की 2022 मध्ये त्याची विक्री पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा अंदाजे $11 अब्ज कमी असेल.