आजपासून बारावी परीक्षेचा अर्ज भरता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने वर्ष 2022 मध्ये घेण्यात येणाऱया बारावीच्या सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यास 12 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 2 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर मात्र अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

बारावीचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेतलेले, आयटीआय विषय घेतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी चुका टाळण्यासाठी परीक्षा अर्ज कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावेत अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

व्यवसाय शाखेचे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेतलेल्या, आयटीआय विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमिक शुल्कासह ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी 3 ते 11 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 13 ते 20 डिसेंबर या कालावधीतही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरू शकतात, पण अशा विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

परीक्षा कधी होणार?

राज्य शिक्षण मंडळाकडून सध्या तरी बारावीच्या परीक्षेच्या तारखेसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आतापर्यंत फेब्रुवारी–मार्चदरम्यान बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक, लेखी आणि श्रेणी विषयांची परीक्षा घेतली जाते, पण परीक्षा अर्ज भरण्याविषयीच्या परिपत्रकात शिक्षण मंडळाने केवळ वर्ष 2022 मध्ये होणाऱया परीक्षा एवढाच उल्लेख केला असून भविष्यात कोरोनाची स्थिती पाहून परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जारी होण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्यासाठी वेबसाईट – www.mahahsscboard.in

वर्ष 2022 मध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेला नोव्हेंबर–डिसेंबर 2020 च्या आधीच्या परीक्षेतील उत्तीर्ण आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या परीक्षेत श्रेणी सुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसता येणार नाही.