
सामना प्रतिनिधी । माजलगाव
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या फुले पिंपळगाव शिवारातील मॅनकॉट कापूस केंद्रामध्ये शनिवारी सकाळी उषा गणेश ढवळे (रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर जि.बुलढाणा) या महिलेचा पतीने चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून केला. पोलिसांनी पती गणेश ढवळे यास अवघ्या तासाभरात अटक केली.
येथील मॅनकॉट कापूस केंद्रावर उषा व गणेश ढवळे हे पती – पत्नी कामगार आहे. जिनींगवर काम करून उदरनिर्वाह भागवित होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन गणेश तिला नेहमी मारहाण करण्याबरोबरच मानसिक छळ करीत होता. याच संशयातून शनिवारी दोघांमध्ये वाद झाले. यात गणेशने उषाचा दोन्ही हातांनी गळा दाबून खून केला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पतीवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ पथके रवाना केली आणि अवघ्या तासात आरोपी गणेशला पोलिसांनी अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला आहे.

































































