दोन बायका फजिती ऐका, फेसबुकमुळे झाली नवऱ्याची पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

दोन बायका फजिती ऐका या वाक्प्रचाराशी तंतोतंत जुळेल अशी घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे. गेली नऊ वर्ष नाईट शिफ्टचे कारण सांगून पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन दुसरीबरोबर संसार थाटणाऱ्या बिलंदर नवरोबाची फेसबुकमुळे पोलखोल झाली आहे.

गुजरातमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने 2011 साली घरच्यांचा विरोध पत्करून जातीबाहेरील तरुणीशी प्रेमविवाह केला होता. पण घरातल्यांना हे लग्न मान्य नव्हते. यामुळे तरुणाने पत्नीला दुसऱ्या घरात ठेवले. या दरम्यान घरातल्यांनी त्याचे नात्यातील एका तरुणीबरोबर लग्न लावून दिले. घरच्यांच्या दबावापुढे झुकून तरुण लग्नास तयार झाला. त्यानंतर त्याने शक्कल लढवत दोन्ही बायकांना अंधारात ठेवले. नाईट शिफ्टच्या बहाण्याने तो पंधरा दिवस पहिल्या बायकोबरोबर आणि उरलेले पंधरा दिवस दुसऱ्या बायकोबरोबर राहत होता. सगळे आलबेल होते.

या दरम्यान दोघींना मुलेही झाली. पहिलीला अडीच वर्षाचा मुलगा असून दुसरीला 5 वर्षाचा मुलगाही आहे. पण काही दिवसांपूर्वी फेसबुकवर दुसऱ्या पत्नीला नवऱ्याचा एका महिलेबरोबर फोटो दिसला. तिने त्याला याबद्दल विचारले असता ती मैत्रिण असल्याचे त्याने सांगितले व विषय टाळला. पतीवर विश्वास असल्याने पत्नीनेही त्याकडे दुर्लक्ष केले. पण याच दरम्यान मार्केटमध्ये गेली असता तिला फेसबुकवरील ती महिला दिसली. यामुळे तिने तिच्याशी ओळख केली व पतीचा फोटो दाखवत तू याला ओळखतेस का असे विचारले. यावर तो माझा नवरा असल्याचे त्या महिलेने सांगितले. हे ऐकताच दुसऱ्या पत्नीने सासरी धाव घेत सगळा प्रकार सांगितला. पण आम्हांला ते माहित आहे असे सांगत सासरच्यांनी तिची मदत करण्यास नकार दिला.

पतीने केलेल्या फसवणुकीमुळे दुसऱ्या पत्नीला जबर धक्का बसला. पण तरीही हिंमत करत तिने महिला हेल्पलाईनला फोन केला व मदतीची याचना केली. पतीला हे कळाल्यापासून तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.