
सामना ऑनलाईन । हैदराबाद
जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांच्या मांदियाळीत वारंवार झाकोळला जाणाऱ्या विदर्भाच्या उमेश यादवने हैदराबाद येथील दुसऱ्या कसोटीत आपला ठसा उमटवला. त्याने वेस्ट इंडीजचे 6 फलंदाज बाद करताना कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. वेस्ट इंडीजचा पहिला डाव 311 धावांमध्ये आटोपला. पहिल्या कसोटीत धडाकेबाज शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉचा पुन्हा दमदार शो… सुमार फॉर्ममधून जाणाऱ्या अजिंक्य रहाणेचे संयमी अर्धशतक… अन् यष्टिरक्षक रिषभ पंतची आणखी एक आक्रमक खेळी… याच जोरावर हिंदुस्थानने दुसऱ्या दिवसअखेरीस 4 बाद 308 धावा तडकावल्या. आता यजमान संघ फक्त तीन धावांनीच पिछाडीवर आहे.
राहुल, पुजारा अपयशी
मुंबईकर पृथ्वी शॉने राजकोट कसोटीची पुनरावृत्ती याही कसोटीत केली. त्याने पहिल्या चेंडूपासून नैसर्गिक आक्रमक फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पण लोकेश राहुलला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर तो अवघ्या 4 धावांवर त्रिफळाचीत झाला. पृथ्वी शॉने 53 चेंडूंत 1 षटकार व 11 चौकारांसह 70 धावांची खेळी केली. जोमेल वॅरीकनचा चेडू ऑफसाइडला फटकावण्याच्या नादात तो शिमरोन हेथमायरकरवी झेलबाद झाला. त्यानंतर शॅनोन गॅब्रियलने चेतेश्वर पुजाराला 10 धावांवर झेलबाद केल.
शानदार भागीदारी
हिंदुस्थानच्या या डावात दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या झाल्या. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. दोघांची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर विराट कोहली 45 धावांवर पायचीत झाला. त्याने 5 चौकारांसह 45 धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने रिषभ पंतच्या साथीने 146 धावांची अभेद्य भागीदारी रचली. अजिंक्य रहाणे 6 चौकारांसह 75 धावांवर खेळत असून रिषभ पंत 2 षटकार व 10 चौकारांसह 85 धावांवर खेळत आहे. या वर्षी प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरणाऱ्या अजिंक्य रहाणेसाठी ही खेळी आत्मविश्वास उंचावणारी ठरेल यात वाद नाही. तसेच रिषभ पंतने सलग तिसऱ्या कसोटीत आपली चमक दाखवलीय.
चेसचे चौथे शतक
वेस्ट इंडीजने 7 बाद 295 धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही. रोस्टन चेसने 189 चेंडूंत एक षटकार व आठ चौकारांसह 106 धावा तडकावल्या. हे त्याचे कारकीर्दीतील चौथे आणि हिंदुस्थानविरुद्धचे दुसरे शतक ठरले. उमेश यादवने वेस्ट इंडीजचे उर्वरित 3 फलंदाज बाद केले. त्याने 88 धावा देत 6 फलंदाज बाद केले. याआधी त्याने पर्थ येथे ऑस्ट्रेलियाचे 93 धावा देत 5 फलंदाज बाद केले होते. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.



























































