I RETIRE! ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूच्या पोस्टमुळे क्रीडा विश्वात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे काही काळ क्रीडा विश्वात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर पी.व्ही. सिंधू निवृत्त झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या कारण तिने ट्विटरवर पोस्ट केलेला ‘I RETIRE’ हा शब्द. मात्र काही वेळातच तिची संपूर्ण पोस्ट व्हायरल झाली आणि ती कशाबाबत बोलतेय याचा खुलासा झाला आणि क्रीडाप्रेमीच्या जीवात जीव आला.

पी. व्ही. सिंधू शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटते की, मी खूप दिवसांपासून स्पष्टपणे विचार मांडण्याचा प्रयत्न करतेय. यासाठी माझी स्वतःशीच झुंज सुरू असून मला थोडे बरेही वाटत नाहीये. आता मी याचा सामना करू शकत नाही त्यामुळे मी आज हा संदेश लिहीत आहे. मला माहिती आहे हे वाचून तुम्ही हैराण व्हाल, मात्र माझा विचार वाचाल तेव्हा तुम्ही माझे समर्थन कराल अशी आशा करते असेही ती नमूद करते.

सिंधू पुढे म्हणते, या महामारीमुळे (कोरोना) माझे डोळे उघडले. खेळात असताना मी स्वतःला अखेरपर्यंत मजबूत ठेऊ शकते, मी असे याआधी देखील केले आहे आणि पुन्हा देखील करू शकते. पण या अदृश्य विषाणूपुढे सगळे जग हतबल झाले आहे. लोक महिनोंमहिने घरात अडकून पडले आहेत आणि अजूनही आम्ही बाहेर पडू शकतो की नाही, असा सवाल स्वतःला करत आहेत.

मी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करू शकले नाही. त्यामुळे मी माझ्यातील नकारात्मकता, भीती आणि अनिश्चिततेच्या सावटातून स्वतःला निवृत्त करत आहे. ज्या अज्ञात गोष्टीचे माझ्यावर कंट्रोल नाही त्याला आणि विषाणूबाबत गाफील राहणाऱ्या वृत्तीला मी निवृत्त करत आहे, असे सिंधू म्हणते.

तसेच ती पुढे म्हणते, यामुळे तुम्हाला थोडा झटका बसला असेल, मात्र असामान्य गोष्टी समजावून सांगण्यासाठी असामान्य पध्दती योग्य वाटते. मला वाटते आपल्याला सर्व लक्षात आले असेल आणि येणाऱ्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही ती म्हणते. तिच्या या संदेशामुळे ती खेळातून निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट होते.