‘लवकरच साखरपुडा करेन’, कॅटरिनासोबतच्या रिलेशनशिपवर विक्की कौशलने मौन सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘उरी’ फेम अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सरदार उधम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विक्कीने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक सुरू आहे. चांगल्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारा विक्की कौशल काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतच्या (Katrina Kaif) रिलेशनशिपमुळेही चर्चेत होता. विक्की आणि कॅटरिना यांनी साखरपुडा उरकल्याच्याही बातम्या आल्या होत्या. मात्र यास दुजोरा मिळाला नव्हता. आता या साखरपुड्याच्या बातम्यांवर विक्की कौशल याने प्रतिक्रिया दिली आहे.

विक्की कौशल याने ई-टाइम्सशी बोलताना म्हटले की, अशा प्रकारच्या बातम्या तुमचीच मित्रमंडळी पसरवतात. परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की साखरपुडा करेन आणि ती वेळ लवकरच येईल. मात्र यादरम्यान त्याने आपण नक्की कोणाशी साखरपुडा करू हे मात्र सांगितले नाही.

दरम्यान, याच वर्षी ऑगस्ट महिन्यात विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. कॅटरिना कैफ ‘टायगर-3’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी रशियाला रवाना होणार होती त्याचवेळी या बातम्या आल्या होत्या. मात्र यास कॅटरिना आणि विक्की कौशल यापैकी कोणीही दुजोरा दिला नव्हता.