तोंड काळं करून आलीय, मी घरात घेणार नाही! अंजूच्या वडिलांचा दृढनिश्चय

पाकिस्तानला गुपचूप पळून गेलेली अंजू 4 महिन्यांनी पुन्हा हिंदुस्थानात परतली आहे. ती परत आल्याचे समजताच अंजूच्या वडिलांनी तिला घरी येण्यास मनाई केली आहे. “पाकिस्तानात जाऊन तोंड काळे करून आली आहे. आता तिचे काय करायचे हे तिचा पती जाणो आणि पोलीस जाणो. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही… ” अशा कठोर शब्दांत अंजूचे वडिल गयाप्रसाद थॉमस यांनी अंजूला फटकारले आहे.

सध्या अंजू दिल्ली विमानतळावर असून थॉमस यांनी अंजूला तिच्या सासरी म्हणजे ग्वालियरमधील टेकनपूर येथे जाण्यास सांगितले आहे. तसेच तिचे माहेरी येण्याचे सगळे दरवाजे बंद झाले असल्याचे ही गयाप्रसाद थॉमस यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गयाप्रसाद थॉमस यांनी ” ज्या दिवशी अंजू पाकिस्तानला गेली होती. त्याच दिवशी ती माझ्यासाठी मेली आहे. आता तिथे जाऊन तिने तोंड काळे करुन आलीय, त्यामुळे मी तिला घरात घेणार नाही. तिला आता आपल्या मुलांची आठवण येतेय? पळून जाण्यापूर्वी मुलं आठवली नाहित? मुलांची चिंता असती तर पाकिस्तानला गेलीच नसती.

मात्र जे व्हायचं होत ते होऊन गेलं, आता मुलांना देखील तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. बाकी आता सगळ तिच्या नवऱ्यावर अवलंबून आहे. त्याला जे योग्य वाटेल ते करण्यास तो मोकळा आहे. मला आता अंजूची काही देणेघेणे नाही. ती आता कुठे आहे आणि काय करतेय याने मला काही फरक पडत नाही”, अशा कठोर शब्दांत गयाप्रसाद थॉमस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

अंजूने तुमची माफी मागून घरी राहण्याची विनंती केली तर तुम्ही तिला परवानगी द्याल का? या प्रश्नावर अंजू आता माफ करण्याच्या लायकीची  नसल्याचे थॉमस यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ती पुन्हा माझ्याकडे येणार नाही, याची मला खात्री आहे. तिचे आणि माझे नाते केव्हाच संपल्याचे मी तिला सांगितले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी अंजूला पुन्हा घरी घेणार नाही, या निश्चयावर आपण ठाम असल्याचे गयाप्रसाद थॉमस यांनी सांगितले आहे.