
कन्या म्हणजे दान करता येईल अशी वस्तु नाही, असं म्हणत एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या लग्नात कन्यादान विधीला फाटा दिला आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे झालेल्या या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.
येथील जोबा गावात आयएएस अधिकारी असलेल्या तपस्या परिहार आणि आयएफएस अधिकारी गर्वित गंगवार यांचा विवाह संपन्न झाला. तपस्या यांनी यूपीएससी परीक्षेत 23वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा गर्वित यांच्याशी झालेला विवाह चांगलाच चर्चेत आहे.
कारण, या लग्नाचे सर्व विधी हिंदू धर्मानुसार झाले. मात्र, तपस्या यांनी कन्यादान हा विधी करण्यास नकार दिला. लहानपणापासूनच त्यांना समाजाच्या या विचारांमध्ये फरक घडवून आणायचा होता. कुणीही मुलीचं तिच्या इच्छेशिवाय दान कसं काय करू शकतं, हा प्रश्न त्यांना नेहमी पडत असे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून हा विधी न करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी यासाठी गर्वित यांच्या कुटुंबाशी देखील चर्चा केली. दोन्ही कुटुंबांनी यासाठी तयार दर्शवल्यानंतर तपस्या यांनी लग्नात कन्यादानाचा विधी न करण्याचा निर्णय घेतला. तपस्या आणि गर्वित यांचा विवाह संपूर्णतः विधिवत संपन्न झाला. मात्र, या विवाहात कन्यादानाचा विधी झाला नाही. कन्या ही दान करण्याची वस्तू नाही. त्यामुळे तिचं दान केलं जाऊ शकत नाही, असं तपस्या यांचं म्हणणं आहे.
गर्वित यांच्या म्हणण्यानुसार, एकिकडे लग्नानंतर एखाद्या मुलीला संपूर्णतः बदलावं लागतं. ते भांगात कुंकू भरणं असेल नाहीतर अन्य काही परंपरा. पण, या परंपरा मुलावर लागू केल्या जात नाहीत. त्यामुळे समाजात समानता आणण्यासाठी अशा प्रकारच्या प्रथांना वेळीच फाटा देणं योग्य आहे, असं गर्वित यांचं म्हणणं आहे. गर्वित आणि तपस्या यांनी घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.





























































