ICC ची मोठी घोषणा! 15 वर्षांखालील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व जागतिक पटलावर करावे ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी काही नवीन नियम बनवले आहेत. या नियमानुसार आता 15 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.

याआधी पुरुष आणि महिलांच्या अंडर-19 स्पर्धेत अनेकदा 15 वर्षाचे खेळाडूही सहभागी होताना दिसले आहेत. मात्र आता आयसीसीने नियम बदलला असून 15 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय खेळाडूला अंडर-19 स्पर्धा व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळता येणार नाही. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तसेच आयसीसी स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि अंडर-19 क्रिकेटसाठी लागू असणार आहे. याबाबत आयसीसीने घोषणा केली आहे.

…तरच विचार केला जाईल

आयसीसीने याबाबत माहिती देताना सांगितले की, फक्त अपवादात्मक स्थितीत क्रिकेट बोर्ड 15 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयसीसीकडे अर्ज करू शकतो. यावेळी खेळाडूचा अनुभव, मानसिक विकास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दबाव तो सहन करू शकतो अथवा नाही याची चाचपणी केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

15 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू

कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा खेळाडू हसन रजा यांनी 1996 ला 14 वर्ष 227 दिवस वय असताना पदार्पण केले होते. तसेच रोमानियाच्या मारियन घेरसिम (2020) आणि कुवैतच्या मीत भवसार (2019) याने वयाच्या 14 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दोघांनी टी-20 सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या