
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नेपाळ आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना पार पडला. यावेळी नेपाळ संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नेपाळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. नेपाळमय झालेल्या वानखेडे स्टेडियमवर संघाने तसा दमदार खेळही केला, शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र, अवघ्या 4 धावांनी त्यांचा इंग्लंडने पराभव केला. एकदम घासून झालेला सामना संपल्यावर नेपाळच्या संघाने वानखेडेवर फेरी मारत मैदानात मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांचे आभार मानले.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत नेपाळला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या आणि नेपाळला जिंकण्यासाठी 185 धावांचे आव्हन दिले. आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवात खराब झाली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरत सामना जिवंत ठेवला. कर्णधार रोहित पौडेलने 39, दिपेंद्र सिंगने 44 आणि लोकेश बम याने नाबाद 39 धावा करत विजयच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाला 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 180 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले आणि अवघ्या चार धावांनी त्यांचा पराभव झाला.

























































