
ICC T20 World Cup 2026 ला शनिवारपासून सुरुवात झाली. यजमान हिंदुस्थानचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर अमेरिकेसोबत रंगला. या लढतीत अमेरिकेच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांना जखडून ठेवले होते. कर्णधार सूर्यकुमार यादव याने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर हिंदुस्थानने अमेरिकेसमोर 162 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि त्यानंतर अमेरिकेला 8 बाद 132 धावांत रोखत 29 धावांनी विजय मिळवला. या लढतीत सर्वाधिक चर्चा झाली ती अमेरिकेच्या संघातील हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंची आणि त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला शुभम रांजणे.
सध्याच्या घडीला हिंदुस्थानी वंशाचे अनेक खेळाडू सध्या जागतिक स्तरावर इतर देशांचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. यामध्ये शुभम रांजणे हे नाव आघाडीवर आले आहे. पुण्यात जन्मलेला हा 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आता अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा भाग आहे. शनिवारी हिंदुस्थान विरुद्ध झालेल्या लढतीतही तो मैदानात उतरला होता. त्याने 9 चेंडूत 14 धावा फटकावल्या.
तीन पिढ्या, तीन मैदाने!
शुभमचा क्रिकेटशी असलेला संबंध पिढ्यानपिढ्यांचा आहे. त्याचे वडील सुभाष रांजणे यांनी महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट स्पर्धा खेळली आहे, तर त्याचे आजोबा वसंत रांजणे हे हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेट संघामधील दिग्गज मध्यमगती गोलंदाज मानले जात असत. वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेट खेळणाऱ्या शुभमने मुंबईच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली.
मुंबई क्रिकेट ते अमेरिका प्रवास
शुभमने 2016-17 च्या हंगामात मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. तिथे तो सूर्यकुमार यादव आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळला. मात्र, मुंबईच्या तगड्या संघात सातत्याने संधी मिळणे कठीण असल्याने, त्याने नवीन संधींच्या शोधात अमेरिकेला जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. शुभमने जेव्हा अमेरिकेला जाण्याचा विचार केला, तेव्हा हिंदुस्थानचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने त्याला आपल्या मनाचे ऐकण्याचा आणि संधीचे सोने करण्याचा सल्ला दिला होता.
अमेरिकेतील यशस्वी कारकीर्द
* मेजर लीग क्रिकेट (MLC) – अमेरिकेत गेल्यावर शुभमने ‘टेक्सास सुपर किंग्स’ कडून खेळताना आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
* आंतरराष्ट्रीय अनुभव – फाफ डु प्लेसिस आणि अल्बी मॉर्कल सारख्या जागतिक खेळाडूंसोबत खेळल्यामुळे त्याच्या खेळात मोठी सुधारणा झाली.
* विश्वचषक पदार्पण – सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याची अमेरिकेच्या संघात निवड झाली असून, आता तो थेट टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरला.
























































