
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी संपल्यानंतर आयसीसीची ताजी क्रमवारी जाहीर झाली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये हिंदुस्थानचा आक्रमक सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या दोघांनी हनुमान उडी घेतली आहे. सलामीवीर म्हणून पहिलीच कसोटी खेळणाऱ्या रोहित आणि कसोटीमध्ये पहिले द्विशतक झळकावणारा मयांक कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी रोहितने दोन्ही डावामध्ये शतक झळकावण्याचा कारनामा केला होता. रोहितने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127 अशा एकूण 303 धावा चोपल्या होत्या. या दमदार खेळीचा फायदा त्याला ताज्या क्रमवारीमध्ये झाला आहे. रोहितच्या क्रमवारीमध्ये 36 स्थानांची सुधारणा झाली असून तो 17 स्थानावर पोहोचला आहे. मयांक अग्रवालने 38 स्थानांची उडी घेत थेट 28 वे स्थान मिळवले आहे.
… तर काही वर्षापूर्वीच सलामीला आलो असतो, ‘हिटमॅन’ रोहितचा गौप्यस्फोट
ताज्या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. परंतु विराटचे जानेवारी 2018 नंतर पहिल्यांदाच 900 पेक्षा कमी गुण झाले आहेत. त्याच्या नावावर आता 899 गुणांची नोंद आहे. सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या स्मिथपेक्षा तो 38 गुणांनी मागे आहे. आफ्रिकेविरुद्ध आगामी दोन कसोटीत त्याला हे अंतर कमी करण्याची चांगली संधी आहे.
अश्विन टॉप 10 मध्ये दाखल
10 महिन्यानंतर कसोटी संघामध्ये पुनरागमन करणाऱ्या आर. अश्विनने आफ्रिकेविरुद्धची कसोटी गाजवली. या कसोटीत दोन्ही डावात मिळून त्याने आठ बळी घेतले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळींचा टप्पाही गाठला. याचा त्याला क्रमवारीत फायदा असून त्याने टॉप 10 मध्ये पुनरागमन केले आहे.

























































