
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत द्विशतक ठोकणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयम्सन याला क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत केन विलीयम्सन दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि केन विलीयम्सन याचे सारखेच गुण झाले आहेत, मात्र विराटची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर कायम आहे.
क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या, केन विलीयम्सन दुसऱ्या, विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या 10 खेळाडूंच्या यादीत हिंदुस्थानचा चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानावर आहे, तर अजिंक्य रहाणे अकराव्या आणि मयांक अग्रवाल बाराव्या स्थानावर आहे.
अष्टपैलूमध्ये स्टोक्स बेस्ट
दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंड विरुद्ध खराब कामगिरी केल्याने जेसन होल्डर याने आपले पहिले स्थान गमावले आहे. हिंदुस्थानचा जडेजा तिसऱ्या, तर आर. अश्विन सहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या 10 मध्ये फक्त बुमराह
गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या 10 गोलंदाजात हिंदुस्थानचा जसप्रीत बुमराह एकमेव गोलंदाज असून तो नवव्या स्थानावर आहे. आर. अश्विन अकराव्या, मोहम्मद शमी तेराव्या, इशांत शर्मा सतराव्या आणि जडेजा अठराव्या स्थानावर आहे.
क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी
दरम्यान, टी-20 मालिका संपल्यावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 17 डिसेंबर पासून याचा शुभारंभ होणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून आयसीसी क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आघाडीच्या खेळाडूंना आहे.


























































