मुंबईची जुही कजारिया प्रथमच आयसीएसईत मुंबई-ठाणे सरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
juhi-kajaria

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहावी (आयसीएसई), बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. दहावीच्या परीक्षेत देशभरातून प्रथम येण्याचा मान जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलच्या जुही कजारियाला मिळाला. तिला 99.60 टक्के गुण आहेत. तर बारावीच्या परीक्षेत सेंट ग्रिगोरिओस हायस्कूलची विद्यार्थिनी मिहिका सामंतने 99.75 टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. दहावीच्या गुणवत्ता यादीत मुंबई आणि ठाण्यातील 14 विद्यार्थ्यांचा समावेश असून दोन विद्यार्थी हे नाशिक आणि नागपूर येथील आहेत.

‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’च्या वतीने या परीक्षा घेण्यात येतात. देशभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण 1 लाख 96 हजार 271 विद्यार्थी बसले होते यांपैकी 1 लाख 93 हजार 413 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 98.54 इतकी आहे. तसेच एकूण 86 हजार 713 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यांपैकी 83 हजार 697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 96.52 इतकी आहे. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलींचीच कामगिरी सरस ठरली आहे. बारावीच्या परीक्षेत कोलकाता येथील देवांग अग्रवाल आणि बंगळुरूच्या विभा स्वामिनाथन यांनी 100 टक्के गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

निकाल

दहावी 98.54%

बारावी 96.52%

कोचिंग क्लासशिवाय यश मिळवले!

मी संपूर्ण देशातून पहिला क्रमांक पटकावला या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. मी कोणत्याही कोचिंग क्लासेसला गेले नाही. मी केवळ अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित केले. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला. अभ्यासातील तणाव दूर करण्यासाठी अधूनमधून मी संगीत ऐकायचे. इंजिनीयरिंग किंवा कॉमर्सला प्रवेश घेण्याचा माझा विचार आहे.

– जुही कजारिया, दहावी परीक्षेत देशात प्रथम

अभ्यासासोबत छंदही जोपासा

माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे. मला चांगले गुण मिळतील, याची खात्री होती. पण गुणवत्ता यादीत येईन, याचा विचार केला नव्हता. मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, पण त्याचबरोबर आपले छंदही जोपासले पाहिजेत, असा सल्ला मी इतर विद्यार्थ्यांना देईन. छंदांमुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.

– मिहिका सामंत, बारावी परीक्षेत देशात दुसरी

आई-बाबा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा

पहिल्या दिवसापासून अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. अभ्यासाबरोबर पियानो वादन आणि टेबलटेनिस हे छंदही जोपासले. पुढे जाऊन मला डॉक्टर व्हायचे असून या यशामागे आई-बाबा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

– ओजस देशपांडे आयसीएसई देशात तिसरा, सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे

  • आयसीएसई बोर्ड 11 मेपर्यंत शाळांना मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहे.
  • दहावीची एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात येते. 46 विषयांची लेखी परीक्षा असते. यातील 22 विषय हे हिंदुस्थानी भाषेचे असतात. तर 10 परदेशी भाषा असतात. यात 2 शास्त्र्ााrय भाषांचाही समावेश असून विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असते.
  • गुणपडताळणीची मुदत 13 मेपर्यंत आहे. cicse.org या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा निकाल जाहीर झाल्यापासून सात दिवसच आहे.

महाराष्ट्राचा निकाल

  • आयसीएसई (दहावी)
    परीक्षेला बसलेले विद्यार्थी 21,038
    उत्तीर्ण 21,007
    टक्केवारी 99.85
  • आयएससी (बारावी)
    परीक्षेला बसलेले विद्यार्थी 2737
    उत्तीर्ण 2717
    टक्केवारी 99.27