
“जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी पाकिस्तानपेक्षा नरकात जाणं पसंत करेन. मी कधीही पाकिस्तानला जाणार नाही”, अशी टीका ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर केली आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना ते असं म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ते होते. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जावेद अख्तर म्हणाले की, “माझे ट्वीटर पाहा, त्यात खूप शिव्या देणारे आहेत, पण काही लोक माझी प्रशंसाही करतात. काही लोक म्हणतात की, तुम्ही काफिर आहात. काही लोक म्हणतात जिहादी, तू पाकिस्तानला जायला हवे. जर मला पाकिस्तान किंवा नरक यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नरकात जाणे पसंत करेन.”
यावेळी संजय राऊत यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “संजय राऊत हे टी-20 खेळाडू आहे. तो क्रीजबाहेर येतात आणि फक्त चौकार आणि षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची चिंता नाही.”