इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत आहेत – राहुल गांधी

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं की, “जर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या 50 टक्केही धाडस असेल, तर त्यांनी सभागृहात येऊन स्पष्टपणे सांगावं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत.”

राहुल गांधी म्हणाले, “ट्रम्प यांनी 26 वेळा म्हटले आहे की, आम्ही युद्ध थांबवले. जर हिंमत असेल तर पंतप्रधानांनी येथे सभागृहात सांगावे की, ते खोटे बोलत आहेत. जर त्यांच्यात इंदिरा गांधींसारखे 50 टक्केही धाडस असेल तर ते येथे सांगावे. जर त्यांच्यात खरोखरच हिंमत असेल तर पंतप्रधानांनी येथे सांगावे की डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत.”

राहुल गांधी म्हणाले की, “परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की, सर्व इस्लामिक देशांनी दहशतवादाची निंदा केली, पण त्यांनी हे लपवलं की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानची निंदा केली नाही. सर्वांनी फक्त दहशतवादाची निंदा केली.”

राहुल गांधींनी 1971 च्या युद्धाचा उल्लेख करत इंदिरा गांधींच्या धाडसी नेतृत्वाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “सॅम मानेकशॉ यांनी इंदिरा गांधींना सांगितलं होतं की, ऑपरेशनसाठी सहा महिन्यांचा वेळ हवा. इंदिरा गांधींनी त्यांना पूर्ण वेळ दिला. त्यांनी अमेरिकेची पर्वा केली नाही, आणि परिणामी एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली.” त्यांनी सरकारवर आरोप केला की, पहलगाम हल्ल्यानंतर 30 मिनिटांतच सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती दर्शवली. ते म्हणाले, “संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण ही कारवाई तीव्र नव्हती. याने सरकारची लढण्याची इच्छाशक्ती नसल्याचं दिसतं. सरकारने लष्कराचे हातापाय बांधले.”