
सामना ऑनलाईन । बलिया
लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांना पायताणाने मारण्याचा वादग्रस्त सल्ला उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी समर्थकांना दिला आहे. त्यांच्या या विधानाचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. याआधीही सिंग वादग्रस्त विधाने करून चर्चेत आले होते.
चेतावणी दिनानिमित्त सुरेंद्र सिंग बलियामध्ये आले असताना त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर राग काढला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे रेकॉर्डिंग करून आपल्याला आणून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच ‘घूस माँगे तो घूसा दो, नही माने तो जूता दो’ असे सांगत लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांना पायताणाने मारण्याचा सल्ला त्यांनी समर्थकांना दिला. नागरिकांच्या भल्यासाठी आपण तुरुंगात जायलाही तयार आहोत, असे सांगत प्रत्येक कामासाठी सरकारी अधिकारी लाच मागत आहेत. हे थांबलेच पाहिजे, असे ते म्हणाले. कैराना आणि नूरपूरमध्ये पक्षाच्या झालेल्या पराभवाबाबत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर खापर फोडले.‘


























































