शरद पवार राष्ट्रपती होणार असतील तर काँग्रेसचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीनंतर आता देशाचे लक्ष आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडीकडे लागले आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर यासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल असे विधान नाना पटोले यांनी केले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे. 15 जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून शरद पवार यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नावाची राष्ट्रपतीपदासाठी चर्चा होत असताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्या विधानाने लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राची व्यक्ती देशाची राष्ट्रपती होत असेल तर याचा मला आनंदच होईल. शरद पवारांकडे राष्ट्रपतीपद येणार असेल तर काँग्रेसचा त्याला पूर्ण पाठिंबा असे ट्विटही नाना पटोले यांनी केले आहे.

आपच्या संजय सिंह यांनीही घेतली भेट

आप पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली. भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी भेटीमागचे प्रमुख कारण राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्याचे समजते. या भेटीदरम्यान संजय सिंह यांनी राष्ट्रपती पदासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.