मर्द असाल तर समोर या!  पाकिस्तानी तालिबानची आसीम मुनीर यांना धमकी

तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना धमकी दिली आहे. ‘सैन्याला मरायला कशाला पाठवता? मर्द असाल तर तुमच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत समोरासमोर येऊन लढा,’ असे आव्हानच टीटीपीने दिले आहे.

टीटीपीने काही व्हिडीओ प्रसिद्धीस दिले आहेत. त्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षाची दृश्ये आहेत. त्यातील एका क्लिपमध्ये टीटीपीचा कमांडर काझीम याचे भाषण आहे. त्याने मुनीर यांना लक्ष्य केले आहे. ‘आईचे दूध प्यायला असाल तर आमचा सामना करा,’ असे म्हणत काझीमने मुनीर यांना डिवचले आहे. पाकिस्तान सरकारने काझीमला पकडून देणाऱ्यास 10 कोटींचे इनाम जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काझीमने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

टीटीपीला आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांत व आसपासच्या आदिवासी प्रदेशातून पाकिस्तानी राजवट उलथवून लावणे हा टीटीपीचा अजेंडा आहे. त्यातून ही संघटना पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत असते.