
शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांनी भगव्याला कलंक लावला. तो कलंक आता धुवायचा आहे. भगव्याला कलंक लावणारे हात कलम करून त्यांना राजकारणातून कायमचे गाडून टाकायचे आहे.
तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही मर्द असाल तर निवडणूक लावून दाखवा. जनतेच्या या वज्रमुठीचा सामना करून दाखवा, असे उघड आव्हान आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिध्यांना दिले. मिंध्यांनी महाराष्ट्राला बदनाम केले आहे. महाराष्ट्र गद्दारांचा कधीही होऊ शकत नाही. महाराष्ट्र हा वीरांचा आहे आणि हे वीर माझ्यासोबत आहेत. आपल्याला गद्दारांना गाडायचे आहे. त्यासाठी सिल्लोडच काय मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. महाराष्ट्र फक्त कापसासारख पिंजायचा नाही तर आपल्याला गद्दारांची विल्हेवाट लावायची आहे. म्हणूनच सज्ज व्हा. दिवसा सूर्य आग ओकत आहे, खाली जमीन तापलेली आहे आणि मध्ये तुमची डोकी आहेत. ही डोकी विचारांनी तापली पाहिजेत. ही डोकी जर का एकदा भडकली तर समोर कितीही ताकदवान येवोत त्यांचा फडशा पडणारच! आता थांबायचे नाही, अशी साद उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला घातली तेव्हा दोन्ही हात उंचावत वज्रमूठ आवळून जणू एल्गारच पुकारला गेला.
पाचोऱ्यातील सावा मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली. मैदानाचा कोपरान्कोपरा गर्दीने खच्चून भरला होता. याच गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यांचा समाचार घेतला. आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली.
गद्दार गेले तर फरक नाही, पण एक विश्वासू जातो तेव्हा खड्डा पडतो
उद्धव ठाकरे यांनी यावेळी आर. ओ. तात्या पाटील यांनी शिवसेनेसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. ‘आर. ओ. तात्या पाटील यांच्यासारखा कणखर, खंदा, जिद्दी, मेहनती व अत्यंत प्रामाणिक विश्वासू सहकारी जाणे हे मोठे नुकसान आहे. चाळीस गद्दार गेले तरी फरक पडत नाही, पण एक विश्वासू जातो तेव्हा मोठा खड्डा पडतो. त्यांच्या पुतळय़ाचे अनावरण करावे लागेल असे मला कधीही वाटले नव्हते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आर. ओ. तात्या पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेतकऱ्यांनी मेहनत केल्यानंतर त्यांचे कुटुंब समृद्ध व्हावे यासाठी झटणारे हे घराणे होते, असे ते म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या केंद्र सरकारवरही उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘मला अमित शहा यांना विचारायचे आहे की, तुम्ही विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावली आहे. तुरुंगात जाता की भाजपात येता असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर ठेवता. अशा वेळी काही जण लाचारी म्हणून भाजपात जातात, तर काही खोक्यांसाठी जातात. आमच्या नेत्यांवर तुम्ही धाडी घालता. भ्रष्ट म्हणून तुम्ही त्यांच्यावर धाडी घालता, मग हीच माणसे तुमच्याकडे आली की तुम्ही गोमूत्र टाकून त्यांना शुद्ध करून घेता का? तुमच्यात शुद्ध आणि आमच्यात भ्रष्ट कसे काय?’
घोडय़ावर चढवले तसेच खाली खेचा
शिवसेनेशी गद्दारी करणारे गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘निवडणूक आल्यावर कार्यकर्ते प्रचार करतात. मरमर राबतात आणि हे पिकोजी नंतर वर जाऊन बसतात. संजय राऊत त्यांना ‘गुलाबो गँग’ म्हणतात. या पिकोजीरावांना वाटते की ते घोडय़ावर बसले. ते घोडय़ावर बसल्यावर लाथासुद्धा लोकांनी खायच्या आणि त्यांनी मात्र आरामात बसायचे. हे आता चालणार नाही. जसे त्यांना घोडय़ावर चढवले तसेच आता पुन्हा खाली खेचण्याची वेळ आली आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर उपस्थितांनी टाळय़ांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिला.
भगव्याला कलंक लावणाऱ्यांना कायमचे गाडायचे
‘शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांनी भगव्याला कलंक लावला. तो कलंक आता धुवायचा आहे. भगव्याला कलंक लावणारे हात कलम करून त्यांना राजकारणातून कायमचे गाडून टाकायचे आहे’, असा खणखणीत इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘अजूनही संयम बाळगतोय, म्हणजे नामर्द नाही’
‘सभेमध्ये घुसण्याची वल्गना करणारे कधी घुसताहेत याची वाट बघत होतो, पण घुसण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. दाखवू शकतही नाहीत. संजय राऊत बोलले होते ‘तुम्ही घुसाल तर परत जाऊ शकणार नाही.’ अजूनही संयम बाळगतोय म्हणजे नामर्द नाही’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बजावले.
भाजपचे पाशवी, विकृत हिंदुत्व मान्य नाही
गोहत्याबंदी तसेच महिलांवरील अत्याचाराचे दाखले देत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखाही फाडला. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात गोहत्याबंदी आहे, पण गोव्यात नाही. गोमांस घेऊन चालला असा संशय आला तरी भररस्त्यात चिरला मारला जातो, असे पाशवी हिंदुत्व आमचे नाही.’ गाईला जितकी सुरक्षा देता तितकीच इथल्या आईला द्या, असा सणसणीत टोला लगावतानाच ठाण्यातील रोशनी शिंदे हल्ला प्रकरणाचे उदाहरण उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘मातृत्वावर उपचार घेणाऱ्या रोशनी या हात जोडून विनंती करत असतानाही त्यांना खाली पाडून मिंध्यांच्या गुंड महिलांनी त्यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसऱ्या दिवशी मोर्चा काढूनही तिची तक्रार घेतली गेली नाही. तिच्यावरच गुन्हे दाखल केले.’ असे सांगतानाच, हे हिंदुत्व भाजपला मान्य आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. गाईला सुरक्षा देताय तशीच ती आईलाही द्या, असे ते म्हणाले.
आता गद्दारांना आपटण्याची वेळ आली आहे
भाजप हे आपल्याला कधीच आव्हान वाटले नाही. भाजप हे आव्हान नाही, मात्र ते सत्तेत असताना जे नुकसान करत आहेत ते भरून कसे काढायचे हे आव्हान आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. लोकसंख्येच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर आलोय, पण या लोकसंख्येत बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत असतील तर लोकसंख्यावाढीचा फायदा काय? असा सवालही त्यांनी केला. वाढत्या महागाईबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर आसुड ओढले. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने केली होती, पण किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला असता त्यांनी एकमुखाने ‘नाही’ असा प्रतिसाद दिला. इतके करूनही निवडणुका आल्यावर पुन्हा ‘अब की बार’ करतील, पण अब की बार…आपटी बार, आता गद्दारांना आपटण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंमत असेल तर जनतेच्या वज्रमूठीचा सामना करून दाखवा
‘या सभेत दिसणारी गर्दी ही फक्त जल्लोष असायला नको, गद्दारांना गाडायचे आहे, असा निर्धार करा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला दोन्ही हात उंचावून वज्रमूठ दाखवा असे आवाहन केले. त्यावर लाखोंच्या गर्दीतून मुठी उंचावल्या गेल्या. ‘महाराष्ट्र शूरांचा आणि विरांचा आहे. हा गद्दारांचा नाही. तुम्ही शेतातले तण काढता, तसे गद्दारांना या जळगावच्या सुवर्णभूमीतून उखडून फेका’, असे जबरदस्त आवाहन त्यांनी केले. तसेच हिंमत असेल तर जनतेच्या या वज्रमुठीचा सामना करून दाखवा, असे आव्हान त्यांनी मिंधे सरकार आणि भाजपला दिले. ‘मी केवळ सिल्लोडमध्येच नाही तर राज्यभरात येणार आहे. तुमच्यावर पुढच्या निवडणुकीची जबाबदारी आहे.’ असेही ते उपस्थितांना म्हणाले.
भाजपच्या हिंदुत्वाला ना आगा ना पिछा, शेंडा बुडका काहीच नाही
हिंदुत्व सोडले असा आरोप करणाऱ्या भाजपचाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिशेब चुकता केला. गेल्या तीन वर्षांत मी हिंदुत्व सोडल्याचा एकतरी प्रसंग मला सांगा असे आव्हानच त्यांनी दिले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली. कोरोना काळात सर्वधर्मीयांना समान वागणूक दिली. मी हिंदुत्व सोडले नाही, सोडणार नाही. आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे. भाजपच्या हिंदुत्वाला आगा पिछा, शेंडा बुडका काहीच नाही’
हे अवकाळी सरकार
आताचे सरकार उलटय़ा पायाचे आणि अवकाळी सरकार आहे. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा, असे उद्धव ठाकरे यांनी सभेला उपस्थित बळीराजाला विचारले.
टाका सगळय़ांना जेलमध्ये, एकदाच जेलभरो होऊ द्या!
भाजपमध्ये न जाता जे शिवसेनेत कायम राहिले त्यांच्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला गेला आहे. राजन साळवी, वैभव नाईक या आमदारांना सहकुटुंब सहपरिवार चौकशीला बोलवले जातेय, असे सांगत ‘घरोघरी पोलीस पाठवून छळले जातेय. हा नामर्दपणा आहे. टाका आम्हाला सगळ्यांनाच जेलमध्ये. एकदाच काय तो जेल भरो होऊन जाऊ द्या. तुम्ही नंतर खोटय़ा केसेस बनवा. कुठे ठेवताय इतकी माणसे ते बघू.’ असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले. आव्हान स्वीकारायला मर्दपणा लागतो, तो भाजपमध्ये नाही, असेही ते म्हणाले.
भगव्यावर चोरांचा अधिकार नाही
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा वक्तव्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ‘सत्यपाल मलिक म्हणाले त्यानुसार, सैनिक जर निवडणूक प्रचारासाठी मारले असतील तर भारतमातेच्या सुपुत्रांचे जीव भाजपसाठी ओवाळून टाकायचे काय?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘कारगील युद्धानंतर निवडणुकीत भाजप लष्करप्रमुखांचे पह्टो वापरत होते. गद्दारांचा अधिकार भगव्यावर असू शकत नाही. खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळांच्या हाती भगवा शोभून दिसत नाही. भगव्यावर चोरांचा, गद्दारांचा अधिकार असू शकत नाही. ती औलाद चोरांची आणि भामटय़ांची आहे. भाजपही तेच करतेय.’
ही अवलाद आमची नाही
उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन झाले तेव्हा ‘कोण आला रे कोण आला…गद्दारांचा बाप आला’ अशा घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पाठीवर सोडा, पण आईच्या कुशीवर वार करणारी ही अवलाद आमची असूच शकत नाही.’ कुछ लोग बाप बदल लेते है, चुरा भी लेते है पण त्यांच्याकडे स्वतःचे काही नाही, अशी मिश्कीलीही त्यांनी केली.
पाकिस्तानही सांगेल… शिवसेना कोणाची!
उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले तेव्हा उपस्थित गर्दीतून गगनभेदी जयघोष घुमला. शिवसेना झिंदाबाद…हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो…, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो…अशा घोषणांनी पाचोऱ्याच्या सावा मैदानाचा परिसर दुमदुमून गेला. फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीने आसमान उजळून गेले. फटाक्यांची इतकी आतषबाजी झाली की ‘पुरे आता… जिंकल्यानंतर फोडायलाही ठेवा’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हा सर्व जल्लोष व उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे कळतंय ना आता!’ असा टोलाही त्यांनी गद्दारांना लगावला. शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला विचारले तर तेसुद्धा सांगतील. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्तांना हे समजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. धृतराष्ट्र झालेल्यांना हे समजणार नाही, पण जनता सर्व बघतेय. कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
या जरा आमच्या बांधावरती…
मुख्यमंत्री असताना घरात बसून काम करायचे असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुनश्च समाचार घेतला. मी घरी राहूनही काम करत होतो आणि मिंधे केवळ वाऱ्या करत आहेत काम नाही, अशी सणसणीत चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याने त्याच अनुषंगाने लिहिलेल्या कवितेतील ओळी बोलून दाखवल्या.
अनाथांच्या नाथा
झाल्या असतील तुमच्या वाऱ्या,
तर या जरा आमच्या बांधावरती…
तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंदी,
पण आमच्या कापसाला भाव कधी?…
‘त्या शेतकऱ्याने त्याच्या व्यथांचे शब्दांकन केले. खरंतर त्या शेतकऱ्याला आपण व्यासपीठावरच आणणार होतो, पण सरकार त्याच्यावर कारवाई करेल म्हणून आणले नाही. कारण या सरकारविरुद्ध कुणी खरे बोलले की त्याला तुरुंगात डांबले जाते’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बहिणाबाईंनाही तुरुंगात टाकले असते…
खरे बोलणाऱ्यांच्या मागे हे सरकार पोलिसांचा ससेमिरा लावते असे सांगत त्यांनी कवयित्री बहिणाबाईंचीही आठवण करून दिली. आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाहा या नतद्रष्ट सरकारने तुरुंगात टाकले असते, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला. बहिणाबाई या खान्देशातील होत्या. अशिक्षित असूनही त्यांनी सोप्या भाषेमध्ये कविता रचल्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची एक कविताही बोलून दाखवली.
इमान इसरला त्याले नेक म्हनू नये
जन्मदात्या बापाला इसरला
त्याले लेक म्हनू नये
या कवितेचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी गद्दार मिंध्यांना सणसणीत चपराकच लगावली.
सभेत घुसू म्हणणाऱ्या घुशींना शोधून आपटायचे
पाचोरा येथील सभेत घुसण्याची वल्गना मिंधे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यांचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, ‘आपल्या सभा हाऊसफुल्ल होत आहेत. काहींना वाटले होते की, ते म्हणजे शिवसेना. अरे हट्ट… आम्ही सभेत घुसणार म्हणे…सभेत घुसू म्हणणाऱ्या अशा घुशी खूप पाहिल्या. निवडणुकीत अशा घुशींना बिळातून बाहेर काढून शेपटीला धरून आपटणार’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कमळाबाईला फटके; भाजप हे आव्हान नव्हे
भाजप हे आव्हान बिलकुल नाही, पण जोपर्यंत भाजप देशात आणि राज्यात सत्तेवरती आहे तोपर्यंत माझ्या देशाचे आणि राज्याचे नुकसान करेल. ते पुन्हा भरून कसे काढायचे हे माझ्यासमोर आव्हान आहे.
फटकारे
भ्रष्ट म्हणून तुम्ही ज्यांच्यावर धाडी घालता, ते तुमच्याकडे आले की तुम्ही गोमूत्र टाकून त्यांना शुद्ध करून घेता का?
दोन-पाच इकडे तिकडे गेले असतील पण लाखो-करोडो हात माझ्यासोबत आहेत. आमचा केस वाकडा करण्याची कोणाची हिंमत नाही.
तुमच्या मेहनतीचे रक्त पिऊन फुगलेली ही ढेकणं आहेत. यांना मारायला तोफ लागत नाही; यांना चिरडायला मतदानाचे एक बोट पुरेसे आहे.
पाठीवर सोडा, पण आईच्या कुशीवर वार करणारी ही अवलाद आमची असूच शकत नाही. कुछ लोग बाप बदल लेते है, चुरा भी लेते है, पण त्यांच्याकडे स्वतःचे काही नाही.





























































