
सामना प्रतिनिधी, घोटी
नाशिक जिह्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱया भागांमध्ये इगतपुरी तालुक्याचा समावेश होतो. मात्र, येथील पाणीपुरवठा योजना केवळ नामधारी ठरल्यामुळे तालुक्याला पाणीटंचाईचे ग्रहण लागल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील भाम, वाकी, खापरी व दारणा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. त्यामुळे वैतरणा, दारणा, कडवा या मोठय़ा धरणांसह भावली, भाम, वाकीखापरी, शेणवड ही धरणे भरली जातात. या पाण्याचा लाभ मुंबईचा निम्मा परिसर व मराठवाडय़ालाही होतो. मात्र, सध्या तालुक्याच्या पूर्व भागातील मायदरा, वासाळी परिसरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
इगतपुरी पंचायत समिती प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील पाणीपुरवठा योजना केवळ नामधारी ठरली आहे. भल्या पहाटे, रखरखत्या उन्हात पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी डोक्यावर हंडा घेवून जाणाऱया महिलांची धडपड ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. तरी याची तत्काळ दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.




























































