आयआयएफएल मुंबई ज्युनियर बुद्धिबळ – अग्रमानांकित ओम कदमने सहाव्या फेरीअखेर घेतली आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत खेळवण्यात येत असलेल्या आयआयएफएल मुंबई ज्युनियर (13 वर्षांखालील) ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित ओम कदमने सहाव्या फेरीअखेर आपल्या सर्व लढती जिंकत 6 गुणांसह एकटय़ाने आघाडी घेतली आहे. या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून ओमकडे पहिले जात आहे.

आज सहाव्या फेरीत ओम आणि  दुसरा संयुक्त आघाडीवीर गौरांग बागवे यांच्यात प्रदीर्घ अशी लढत रंगली. कारण उभय खेळाडूंनी आरंभापासूनच बचावात्मक खेळ केला. अखेर 73 व्या चालीअखेर ओमने गौरांगच्या नाइट डिफेन्स बचावाला अफलातून उत्तर देत 73व्या चालीत स्पर्धेतील आपला सलग सहावा विजय साकारत 6 गुणांच्या कमाईसह आघाडी मिळवली.

दुसऱ्या पटावर अरविंद अय्यर (एलो 1662) आणि रघुराम रेड्डी (एलो 1712) यांच्यातील लढत गियको पियानो ओपनिंगमध्ये त्याच त्याच चालींची पुनरावृत्ती झाल्याने बरोबरीत सुटली. दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण लढतीत आदिरेड्डी अर्जुन (एलो 1658) याने अफलातून चाली रचत यश भराडिया (1675) याला 61 व्या चालीअखेर सिसिलियन बचाव पद्धतीने काळ्या मोहऱ्या घेऊन पराभूत केले. या विजयासह 5.5 गुण मिळवत आदिरेड्डी दुसऱ्या स्थानावर आला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतचे तिसरे स्थान गौरांग बागवे, अरविंद अय्यर, रघुराम रेड्डी, जयवीर महेंद्रू, दक्षील काजरोळकर आणि अजय एस. पी. यांनी संयुक्तपणे मिळवले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत टॉपवर असलेला इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य दुर्दैवाने आजारी पडल्याने मागे पडला आहे. पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस असलेल्या या स्पर्धेच्या तीन फेऱ्या अद्याप बाकी आहेत. त्यामुळे स्पर्धा रंगतदार स्थितीत आली आहे.