
बारावीनंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) प्रवेश घेणाऱया बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयआयटी प्रवेशासाठी बारावीत 75 टक्के किंवा टॉप 20 पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यंदा मात्र जॉईंट एक्झाम बोर्डाने ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा जेईई प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. जॉईंट एक्झाम बोर्डाच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीबीएसईसह अनेक राज्य शिक्षण मंडळांना बारावीची पूर्ण परीक्षा घेता आली नाही. काही राज्यातील परीक्षा रद्द झाल्या. या पाश्वभूमीवर यंदाच्या वर्षी आयआयटी प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बारावीनंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरूनही याविषयी माहिती दिली आहे.
आयआयटी प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई ऍडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात.
जेईई मेन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ऍडव्हान्स्डसाठी पात्र ठरतात.
मात्र जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत पात्र ठरल्यानंतर बारावीचे गुणदेखील ग्राह्य धरले जातात
आतापर्यत बारावीत 75 टक्के किंवा टॉप 20 पर्सेंटाइल आवश्यक होते.
तसेच एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना बारावीत किमान 65 टक्के गुण आणि टॉप 20 पर्सेंटाइल अनिवार्य आहेत.
यंदा मात्र या दोन्ही गोष्टी आवश्यक नाहीत.
बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला जेईई ऍडव्हान्स परीक्षेतील मेरिटनुसार आयआयटी प्रवेश मिळणार आहे.
जेईई मेन 1 ते 6 सप्टेंबर तर ऍडव्हान्स 27 सप्टेंबरला
कोरोनामुळे जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्स परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबरला होणार आहे.



























































