
रोजगार क्षेत्रात मंदी असली तरी आयआयटी संस्थांमधील विद्यार्थ्यांवर मात्र देशविदेशातील नामांकित कंपन्यांच्या उडय़ा पडल्या आहेत. 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये लाखो-करोडो रुपये वेतनाच्या नोकऱया विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. गेल्या आठवडाभरात अनेक आयआयटी संस्थांतील 50 टक्के विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून ऑफर्स मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या प्लेसमेंटपेक्षा यंदा हा आकडा समाधानकारकरीत्या वाढला आहे.
मुंबईच्या विद्यार्थ्यांवर परदेशी कंपन्यांच्या उडय़ा
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी मिळवण्यासाठी परदेशी कंपन्यांच्या उडय़ा पडल्या. कॅम्पस प्लेसमेंटसाठी 15 जपानी कंपन्यांनी नोंदणी केली होती. त्यातील होंडा कंपनीने सात विद्यार्थ्यांची निवड केली तर सोनी या कंपनीने पाच विद्यार्थ्यांची निवड केली. यंदा उद्योग क्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करूनच प्लेसमेंटसाठी कंपन्यांची निवड करण्यात आली. या वर्षी परदेशातील नोकऱयांच्या ऑफर्स चांगल्या मिळाल्याची माहिती प्लेसमेंट सेलमधील सूत्रांनी दिली.
दिल्लीत सर्वाधिक ऑफर्स इंजिनीयरिंग क्षेत्रातून
प्लेसमेंटच्या पहिल्या पाच दिवसांमध्येच आयआयटी दिल्लीमधील 782 विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. यावेळी नोकऱयांच्या 28 टक्के ऑफर्स या इंजिनीयरिंग क्षेत्रातून आल्या होत्या. आयटी क्षेत्रातून 26 टक्के, ऍनालिटिक्स क्षेत्रातून 14 टक्के तर कन्सल्टिंग क्षेत्रातील कंपन्यांकडून 8 टक्के ऑफर्स मिळाल्या. मायक्रोसॉफ्टकडून 30, सोशिएट जनरल 13, मास्टरकार्ड 11 तर स्टँडर्ड चार्टर्डकडून 10 ऑफर्स मिळाल्या.
रुरकीमध्ये 121 कंपन्यांकडून 721 ऑफर्स
आयआयटी रुरकीमधील प्लेसमेंटमध्ये 121 कंपन्यांकडून 721 ऑफर्स देण्यात आल्या. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून सर्वाधिक 1 कोटी 54 लाखांच्या वार्षिक वेतनाचे पॅकेज देण्यात आले. देशांतर्गत नोकरीची सर्वात मोठी वार्षिक 62 लाख रुपये वेतनाची ऑफर कोहेसिटी या कंपनीने दिली.
खरगपूरमध्ये दोन हजारांपैकी 1119 विद्यार्थ्यांची निवड
आयआयटी खरगपूरमधील 50 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या पहिल्याच आठवडय़ात नामांकित कंपन्यांनी निवडले. सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. त्यातील 1119 विद्यार्थ्यांची निवड झाली. गेल्या वर्षी प्लेसमेंटच्या पहिल्या आठवडय़ात हा आकडा 900 होता. सहा दिवसांमध्ये 160 कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. 44 विद्यार्थ्यांची परदेशातील नोकऱयांसाठी निवड झाली. त्यात सोनी, उबेर, पेपल, ऍसेंचर जपान, हनीवेल या कंपन्यांचा समावेश होता. सरकारी कंपन्यांनीही 20 विद्यार्थ्यांची निवड केली.

























































