
गंगाखेड तालुक्यात डोंगरजवळा शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या एका पथकाने शुक्रवारी सायंकाळी गांज्याची शेती करणार्या दोघा शेतकर्यांना ताब्यात घेऊन शेतीतून लागवड केलेल्या सुमारे 170 किलो वजनाच्या व अंदाजे 8 लाख 60 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचार्यांना अवैंध व्यवसायाविरूध्द कठोर कारवाईचे आदेश बजावले होते. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना पेट्रोलिंग दरम्यान पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे डोंगरजवळा शिवारात नाथराव देवराव मुंडे हे विनापरवाना गांज्याची झाडांची लागवड व विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या गोष्टीची खातरजमा केल्यापाठोपाठ सहाय्यक पोलिस निरीक्षक आलेवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद विपट, फौजदार किशोर नाईक, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, दिलावर पठाण, बाळासाहेब तुपसमुंदरे, जमीर फारोकी, शंकर गायकवाड, शेख अजहर शेख, सय्यद मोईन, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, घुगे, शिंदे यांच्या पथकाने त्या शिवारात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गट क्र. 64 व 65 मध्ये छापा टाकला. त्यावेळी नाथराव देवराव मुंडे यांची विचारपूस केली.
पाठोपाठ लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली असता कापूस व तुरीत अंतरपीक म्हणून या शेतकर्याने जागोजागी हिरवीगार बोंडे आलेली उग्रट वासाची झाडांची लागवड केल्याची बाब समोर आली. या झाडाची उंची 5 ते साडेसहा फुट असावी. कापूस व तुरीच्या पिकात गांज्याची झाडे लपुन गेली असल्याचेही दिसून आले. गट नं. 64 मध्ये एकूण 25 हिरवी व 3 वाळलेली झाडे आढळून आली. या शेताच्या पश्चिमेस गट नं. 65 मध्येही कापूस व तूरीच्या पिकात 21 हिरवी व पाच वाळलेली झाडे असल्याचे दिसले. ही सर्व गांज्याची झाडे पथकाने जप्त केली. यात अंदाजे दोन लाख 80 हजार रुपयांची अंदाजे 600 ग्रॅम वजनाची, गांज्यांची बोंडे आलेली उग्रट वासाची हिरवारी झाडे, अंदाजे चार लाख रुपयांची 21 हिरवीगार बोंडे असलेली उग्रट वासाची गांज्याची झाडे व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली अंदाजे वजन 80 किलो, 19 हजार रुपयांची अंदाजे एक किलो 900 ग्रॅम वजनाचे पाच वाळून गेलेली झाडे, असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
त्याचबरोबर त्या शेताच्या बाजूस असलेल्या शेतात दगडीराम देवराव यांच्याही शेताची पाहणी केली असता तेथेही कापूस व तुरीच्या झाडामध्ये गांज्याची शेती घेत असल्याचे दिसून आले. तेथे गांज्याची 35 झाडे उग्रट वासाची हिरवीगार व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली पथकास आढळली. 1 लाख 55 हजार रुपये अंदाजे किंमतीची एक किली ग्रॅम वजनाची झाडे पथकाने जप्त केली. या पथकाने 138.5 किलोग्रॅम वजनाची सात लाख 50 हजार रुपयांची तर 31 किलो वजनाची एक लाख 55 हजार रुपयांची झाडे अनुक्रमे नाथराव देवराव मुंडे व दगडीराम देवराव मुंडे यांच्या शेतात आढळली असल्याचे पथकाने म्हटले असून या दोघांविरूध्द पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करीत आहेत.
































































