अनधिकृत बांधकामांना चाप बसणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर आता पालिकेची करडी नजर असणार आहे. वारंवार कारवाईनंतरही अनधिकृत बांधकामे करणाऱयांवर एमआरटीपीअंतर्गत थेट पोलिसांत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश सोमवारी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. ही कारवाई करताना अतिक्रमण करणाऱयांना ’मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966’अन्वये नोटीसही दिली जाते. तरीही काही दिवसांनी पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहतात. बी वार्डातील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या अनधिकृत बांधकामांची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी आता कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जाणार असल्याने अनधिकृत बांधकामांना चाप बसणार आहे. काही दिवसांपूर्वी धारावी झोपडपट्टीत अनधिकृत बांधकाम करणाऱया पाच कंत्राटदारांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.