कोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट 

48

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क व जयसिंगपूर पोलिस यांच्या पथकाने छापा टाकून तो उद्ध्वस्त केला. या कारवाईत हातभट्टीच्या दारू व रसायनसाह तब्बल दोन लाख 2७ हजार 400 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

याप्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून हे सहाही जण फरारी आहेत. राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय आयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. बबन माने, रमेश माने, तुकाराम जाधव, शिवाजी माने, अर्जुन चव्हाण, सत्पाल माने अशी ङ्गरार सहा संशयितांची नावे आहेत.

दानोळी येथील उमाजीनगर येथे बेकायदा हातभट्टीची दारू बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, इचलकरंजी विभागाचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी. आर. पाटील, जिल्हा भरारी पथक निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे यांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचे साहित्य आढळून आले.

या छाप्यात 9450 लीटर कच्चे रसायन, 11 सिंटेक्स टाक्या, तीन प्लास्टिकचे कॅन, 51 प्लास्टिक पिशव्यांमध्ये असलेली 200 किलो कच्ची साखर असा दोन लाख 27हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पथकाने नष्ट केला. या पथकात जगन्नाथ पाटील, अतुल पाटील, स्वप्नील पाटील, श्‍वेता खाडे, ए. बी. नडे, अभिनंदन कांबळे, पी. सी. शेलार, दत्तात्रय लकडे, सुधीर भागवत आदिंचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या