
खोपटा ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर काही गाव पुढाऱ्यांनी बेकायदा पार्कींग झोन तयार केला आहे. या पार्किंगमधून ते राजरोसपणे पैसे वसूल करत आहेत. या बेकायदा धंद्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याने त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नवघर -कोप्रोली मार्गावरील खोपटा पूलाखाली खोपटा गावाने बांधलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा आरक्षित भूखंड आहे. भविष्यातील काही शासकीय योजनांसाठी राखून ठेवलेल्या या भूखंडावर खोपटा गावातील काही गाव पुढाऱ्यांनी चार वर्षांपासून भराव टाकून बेकायदा ट्रेलर पार्किंग सुरू केली आहे. हे पुढारी दिवसाला हजारो रुपयांची कमाई करत आहेत. या बेकायदा धंद्यातील काही हिस्सा सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विभाग यावर करावाई करत नसल्याचे स्तानिकांनी सांगितले. याबाबत नागरिकांनी 2016 पासून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या जागेवर बेकायदा पार्कींग करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नोटिस पाठवल्या आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एन. बी. भोये यांनी सांगितले.





























































