
देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा पारा खाली येताना दिसत आहे. उत्तर हिंदुस्थानमधील अनेक राज्यात थंडीची लाट आली असून महाराष्ट्रातही बऱ्याच शहरांचा पारा 15 च्याही खाली आला आहे. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशमधील अनेक भागांत थंडीचा पारा लुडकला असून 5 अंशांहून कमी तापमानाची नोंद झाली आहे. याच दरम्यान हवामान विभागाने येत्या काही दिवसात थंडीचा पारा आणखी खाली जाईल असा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे मैदानी भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. येत्या 23 ते 26 डिसेंबर दरम्यान तापमान 1 ते 3 अंश सेल्सियस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि दिल्लीमध्ये आगामी तीन दिवसात थंडीची लाट आणखी तिव्र होणार आहे. दिल्लीतील तापमान 3 ते 4 अंश सेल्सियसने कमी होण्याचा अंदाज आहे. यादरम्यान धुकेही वाढणार आहे. त्यामुळे वाहकांनी सावधपणे गाड्या चालवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
Fall in minimum temperature by 1-3°C over some parts of plains of northwest India & central India is very likely during next 3 days: IMD
— ANI (@ANI) December 22, 2020
दिल्लीत मंगळवारी 5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आगामी काळात हा थंडीचा पारा 3 ते 4 अंशावर पोहोण्याची शक्यता आहे. दिल्लीसह महाराष्ट्रात देखील थंडी वाढली असून चंद्रपूरमध्ये 10 अंशाहून कमी तापमानाची नोंद झाली आहे.



























































