
सामना प्रतिनिधी । मुंबई
विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात मान्सून दाखल झाला असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण मुंबई मात्र कोरडीच आहे. रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत मजल मारलेला मान्सून मुंबई-ठाण्यात कधी येणार, याकडे प्रत्येक जण चातकासारखे डोळे लावून बसला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवणार्या हवामान खात्याने पुन्हा पलटी मारली आहे. आता कलटी मारलेला पाऊस 26 जून रोजी मुंबईत दाखल होईल, असा नवा अंदाज वर्तवला आहे. आता तरी हा अंदाज खरा ठरेल की पाऊस पुन्हा टांग देईल, हे येत्या चार दिवसांतच स्पष्ट होईल.
नेमकी का अडली मान्सूनची गाडी
दक्षिण गोव्यापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूनसाठी कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात पाऊस पडतोय. कमी दाबाचे हे क्षेत्र किंवा सिस्टीम पुढे उत्तर कोकणपर्यंत सरकल्यानंतरच मुंबईत खर्या अर्थाने पावसाला सुरुवात होईल.
पावसाचा अंदाज
वर्ष अंदाज प्रत्यक्षात मुंबईत आगमन
2018 28 मे 30 मे 9 जून
2017 30 मे 30 मे 11 जून
2016 6 जून 8 जून 20 जून
2015 30 मे 5 जून 14 जून
2014 2 जून 5 जून 12 जून
वर्ष पाऊस (टक्के)
2019 93
2018 91
2017 95
2016 97
2015 86
2014 88
येथे पाऊस पडतोय सेन्टिमीटरमध्ये
कोकण आणि गोवा
देवगड-8, मालवण-7, लांजा-5, संगमेश्वर-देवरुख-4, चिपळूण-4, रत्नागिरी-4.
मराठवाडा
फुलंब्री-11, गंगापूर-5, भोकरदन -5, भूम-5, विजापूर -4, बदनापूर-4, संभाजीनगर- 4.
मध्य महाराष्ट्र
कोपरगाव-13, नेवासा-7, कागल-6, पाथर्डी-6,
राहुरी -5, शिरगाव-5, भुसावळ-3, गगनबावडा-3,
शिरूर -3.


























































