कर्करुग्णांचे तातडीने लसीकरण करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीएमआरच्या अहवालानुसार आणि बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अॅण्ड रिसर्चनुसार, हिंदुस्थानात 2020 या वर्षात साधारणता 6,79,421 पुरुषांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर या वर्षात 7,12,758 महिलांना कर्करोग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आजार वाढल्यास डॉक्टरांना उपचार करणे हे अवघड होत असल्याने या रुग्णांचे तातडीने लसीकरण करण्याची गरज असल्याची मागणी एसीआय कंबाला हिल हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुहास आगरे यांनी केली. कर्करुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांना कोविड -19 आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगावरील उपचारात केमोथेरपीमुळे रुग्णांमध्ये पुरेशी ताकद नसते. कर्करोगाचे अधिक रुग्ण वृद्ध आहेत. जे कोविडसाठी एक जोखीम घटक आहेत. कोविड 19 हा विषाणू फुप्फुसांवर हल्ला चढवतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या लोकांना कोविड संसर्गाचा धोका जास्त असतो. कारण या रुग्णांची फुप्फुसे आधीच कमकुवत झालेली असतात. इतकेच नाही तर कर्करोगाचा परिणाम फुप्फुस किंवा मूत्रपिंडाच्या कार्यावर होतो. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचे लसीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.