गोव्यात शेजारील राज्यांमधून आयात दुधाची होणार तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

भेसळयुक्त खाद्य पदार्थांबाबत लोकांच्या तक्रारींची दखल घेतानाच त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी आता बाहेरील राज्यांमधून गोव्यात  येणाऱ्या दुधातील भेसळ तपासण्यासाठी उद्यापासून कडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. गोव्यात शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून सुमारे 2 लाख लिटरहून अधिक दूध रोज आयात होत असते. गोवा डेअरीच्या काही दुधाचे नमुने आज तपासणीसाठी घेण्यात आले त्यात काहीही आढळून आले नाही.

आयात होणाऱ्या दुधाची सरकारी आकडेवारी रोज दीड लाख लिटर असली तरी रोज प्रत्यक्षात सव्वादोन लाख लिटरहून अधिक दूध रोज परराज्यातून आयात होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुधामध्ये भेसळ असते अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर  सरकारने हे पाऊल उचलले आहे. महानंदा, गोकुळ, नंदिनी, वारणा, आरोक्य, अमूल, कृष्णा, गोविंदा आदि दूध शेजारी राज्यांमधून रोज गोव्यात विक्रीसाठी आणले जाते.

बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या दुधावर आता पर्यंत सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. भेसळ तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करू लागले आहेत. उपलब्ध आकडेवारी नुसार गोव्यात ‘अमुल’चे सुमारे 45 हजार लिटर, ‘नंदिनी’चे 40 हजार लिटर, ‘महानंदा’चे 15 ते 20 हजार लिटर, ‘आरोक्य’चे 25 ते 30 हजार लिटर, ‘कृष्णा’चे 25 ते 30 हजार लिटर, ‘वारण’चे 20 हजार लिटर, ‘गोविंदा’चे 15 ते 16 हजार लिटर आणि ‘गोकुळ’चे 5 हजार लिटर दुध रोज विक्रीसाठी येते.

 दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘कामधेनू’ योजनेचा लाभ दिल्यापासून राज्यातील दूध उत्पादन वाढलेले आहे. सध्या रोज 75 हजार लिटर स्थानिक दुधाचे संकलन होते. 2012-13 मध्ये दिवशी सरासरी 44,276 लिटर, 2013-14 मध्ये रोज 60,954 लिटर, 2014-15 मध्ये दिवशी 63,273 लिटर दुधाचे संकलन झालेले आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी स्थानिक दूध उत्पादनाचा चढता आलेख राहिला आहे. गोव्याची लोकसंख्या 15 लाखांच्या घरात असली तरी दरवर्षी 75 लाख पर्यटक गोव्याला भेट देत असतात. त्यामुळे गोव्यात दुधाची मागणी वाढतच आहे.