
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याची हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. यावर सचिन तेंडुलकर याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अर्जुनच्या निवडीवर तेंडुलकर कुटुंबीय खूप खूश आहे. ‘अंडर१९ संघात अर्जुनची निवड झाल्याने आम्ही खूप खूश आहोत. हा त्यांच्या क्रिकेट करिअरमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. अंजली आणि मी नेहमीच अर्जुनला त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देत आलो आहोत. त्याच्या यशासाठी आम्ही का कायम प्रार्थना करतो, अशा शब्दात सचिननं आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत.
हिंदुस्थानचा युवा संघ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान दोन चारदिवसीय व पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे. अर्जुन तेंडुलकरची चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी युवा संघात निवड करण्यात आली आहे. अनुज रावतकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच वन डे मालिकेसाठी आर्यन जुयालकडे हिंदुस्थानी युवा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.





























































