इम्रान खान यांना जामीन; दोन आठवडय़ांसाठी न्यायालयाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल कादिर संस्थेला दिलेल्या कोटय़वधींच्या जमीन प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन आठवडय़ांसाठी दिलासा दिला असून, त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, इम्रान खान यांना इतर प्रकरणांत अटक होण्याची शक्यता आहे.

अल कादिर शिक्षण संस्थेला कोटय़वधी रुपयांची जमीन फुकटात दिल्याचा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आहे. याच प्रकरणात जामीन घेण्यासाठी आलेले असताना त्यांना भर न्यायालयातून फरफटत नेण्यात आले आणि अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर इम्रान खान यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवली आणि जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे सांगितले. इम्रान खान यांच्या वतीने आज इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडय़ांसाठी जामीन मंजूर केला.