
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थान विरोधात नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मात्र याच जनतेच्या आंदोलनात पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी मोदींविरोधात बोलण्यास सुरुवात करताच माईकमधून वीजेचा प्रवाह वाहू लागला आणि त्यांना करंट लागला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रशीदही घाबरले. पण मोदी आमचे हे आंदोलन थांबवू शकत नाही असे म्हणत त्यांनी सारवासारव केली. शेख यांच्या या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तेथील नागरिकही त्यांच्यावर हसत असल्याचे यात दिसत आहे.
तर हिंदुस्थानी नेटकऱ्यांनी मात्र शेख यांना ट्रोल केले असून हिंदुस्थानपासून दोन हात लांबच राहण्यात शहाणपण असल्याचा त्यांना सल्ला दिला आहे. शेख रशीद सतत हिंदुस्थानविरोधात गरळ ओकत आहे . हिंदुस्थानविरोधात पाकिस्तान व जगभरातील मुस्लीम जनतेला भडकावण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. त्यातच पंतप्रधान इमरान खान यांनी हिंदुस्थानविरोधात पाकिस्तानी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. खान यांच्या या आवाहनाला पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरली होती. यावेळी इमरान यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हिंदुस्थानविरोधात भाषणे केली. यामुळे काहीवेळासाठी येथील वातावरण तणावाचे झाले होते. त्यानंतर रशीद यांनी हातात माईक घेतला व त्यांनी थेट मोदींनाच लक्ष्य केलं. मोदी आम्ही तुमच्या धोरणांना ओळखून आहोत असे त्यांनी म्हणताच त्यांच्या माईकमध्ये करंट आला आणि घाबरलेल्या रशीद यांच्या हातातून माईक पडता पडता राहीला. यावर माईकमधून करंट आला असे रशीद यांनी म्हणताच सगळीकडे हशा पिकला. जो तो हसू लागला. यामुळे हडबडलेल्या रशीद यांनी मोदी आम्हांला थांबवू शकत नाहीत असे म्हटले.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हिंदुस्थानी नेटकऱ्यांनी रशीद यांना ट्रोल केले आहे. कोणी त्यांना मोदी इथे बसून तुम्हांला शॉक देत आहेत. असे हिणवले आहे. तर काहीजणांनी तुमच्याकडे लाईट बिल भरण्यासाठीही पैसे नसताना एवढा करंट आणलात कुठुन असा खोचक सवाल केला आहे.
Sheikh Rasheed k mic mein Modi ne current bhej diya: pic.twitter.com/LsTobPov1q
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) August 30, 2019




























































