
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना एका सामान्य माणसाप्रमाणे कमर्शियल फ्लाईटने अमेरिकेहून पाकिस्तानकडे रवाना व्हावं लागलं आहे. आणि याला कारण ठरलं ते सौदी अरेबियाने उसनं दिलेलं विमान. सौदीने दिलेल्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याने खान यांना कमर्शियल फ्लाईटचा आधार घ्यावा लागला आहे. या घटनेने पाकिस्तानची चांगलीच फटफजिती झाली आहे.
त्याचं झालं असं की, इमरान खान यांना सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी एक खासगी जेट विमान अमेरिकेच्या दौऱ्यासाठी दिलं होतं. त्याच विमानाने खान अमेरिकेत आले होते. शनिवारी परत जातानाही या विमानातून पाकिस्तानात जाण्याचा खान यांचा बेत फसला. शनिवारी संध्याकाळी न्यू यॉर्कच्या केनेडी विमानतळावर खान पोहोचले आणि आपल्या या खासगी विमानात बसले. विमानाने आकाशात झेपही घेतली. पण, काही तांत्रिक बिघाड होत असल्याचं वैमानिकांना लक्षात आलं आणि त्यांनी परतीचा मार्ग स्वीकारला.
हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होईपर्यंत खान यांना बराच वेळ विमानतळावरच खोळंबून राहावं लागलं. त्यानंतर दुपारी दोन वाजता एका कमर्शियल फ्लाईटने सामान्य प्रवाशाप्रमाणे पाकिस्तानसाठी रवाना व्हावं लागलं.


























































