Video – झाडं रात्रीच्यावेळी ऑक्सिजन उत्सर्जित करतात, इमरान खान यांनी तोडले अकलेचे तारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडं दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऑक्सिजन उत्सर्जित करतात व रात्रीच्या वेळी कार्बन डायॉक्साइड सोडतात हे शाळेत असतानाच सर्वांना शिकवले गेले आहे. मात्र या साध्या सामान्य ज्ञानाबाबतही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे अज्ञान असल्याचे समोर आले आहे. इमरान खान यांनी झाडं रात्रीच्या वेळी ऑक्सिजन उत्सर्जित करतात असा अजब दावा एका कार्यक्रमात केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

इमरान खान यांच्या एका भाषणाचा काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानची पत्रकार नायला इनायत हिने तो व्हिडीओ तिच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत इमरान खान यांनी ‘झाडे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन उत्सर्जित करतात’ असे म्हटले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या इमरान यांनी सामान्य ज्ञानावरून तोडलेले अकलेचे तारे बघता पाकिस्तानी जनतेने देखील कपाळावर हात मारून घेतला आहे.

‘जगातील 70 टक्के झाडे गेल्या दहा वर्षात कापली गेली आहे. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील कारण झाडं हवा शुद्ध करतात. ते रात्री आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात’ असे अजब विधान या व्हिडीओत इमरान खान करताना दिसत आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना जबरदस्त ट्रोल केले आहे.