माझे वडील जिवंत आहेत, तर मग पुरावे द्या; इम्रान खान यांचा मुलगा कासिमची मागणी

पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा इंटरनेटवर गेल्या अनेक दिवसांपासून पसरत आहेत. एका अफगाण माध्यमातील सूत्रांवर आधारित अहवालात दावा करण्यात आला होता की, इम्रान खान यांची आदियाला तुरुंगात हत्या झाली आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर, आता त्यांचा मुलगा कासिम खान याने आपल्या वडिलांच्या ‘जीवित असल्याचा पुरावा’ आणि त्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

‘एक्स’ वर केलेल्या एका पोस्टमध्ये कासिम खानने सांगितले की, त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकून ८४५ दिवस झाले आहेत. तसेच, गेल्या दीड महिन्यांपासून त्यांना कुटुंबाशी कोणताही संपर्क न ठेवता एका ‘डेथ सेल’ (मृत्यू कोठडी) मध्ये ठेवले आहे.

कासिमने लिहिले, ‘गेल्या सहा आठवड्यांपासून त्यांना संपूर्ण एकांतवासाच्या वातावरणात ‘डेथ सेल’मध्ये एकटे ठेवण्यात आले आहे. स्पष्ट न्यायालयीन आदेश असूनही त्यांच्या बहिणींना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणतेही फोन कॉल नाहीत, भेटी नाहीत आणि त्यांच्या तब्येतीची कोणतीही बातमी नाही. मी आणि माझ्या भावाला आमच्या वडिलांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधता आलेला नाही.’

असे सर्वांना अंधारात ठेवणे कोणत्याही सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग नाही, असे कासिम यांनी आरोप केला. त्यांच्या वडिलांची खरी स्थिती लपवण्यासाठी आणि कुटुंबाला त्यांच्या ठिकाणाबद्दल माहिती मिळू नये यासाठी हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

कासिम पुढे म्हणाला, ‘हे स्पष्ट झाले पाहिजे की पाकिस्तानी सरकार आणि त्यांची मालक होऊन बसलेल्यांना माझ्या वडिलांच्या सुरक्षेसाठी आणि या अमानवी एकांतवासाच्या प्रत्येक परिणामासाठी संपूर्ण कायदेशीर, नैतिक आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारी स्वीकारावी लागेल.’

कासिमने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्याने अनेक मागण्या केल्या आहेत, ज्यात वडिलांना भेटण्याची न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी मिळणे, ‘अमानवी एकांतवास’ संपवणे आणि ‘केवळ राजकीय कारणांसाठी तुरुंगात टाकलेल्या नेत्याची सुटका’ अशा गोष्टींचा समावेश आहे.

इम्रान खान यांच्या तीन बहिणींपैकी एक असलेल्या अलिमा खानम यांनीही कुटुंबीयांना इम्रान खान यांना भेटण्याची वारंवार परवानगी नाकारली जात असल्याचा दावा केला आहे.

इम्रान खान यांच्या बहिणीने एका मुलाखतीत सांगितले की, ‘गेल्या ६-७ महिन्यांपासून त्यांनी खूप त्रास दिला आहे; कधी मला भेटायला द्यायचे, कधी माझ्या एका बहिणीला. आता तर कोणालाच भेटायला देत नाहीत. अनेक वेळा आम्ही बाहेर ताटकळत उभे राहतो’.