इम्रान मेहंदी अपहरण कटप्रकरणी आणखी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

न्यायालयातून इम्रान मेहंदीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान परप्रांतीय गुन्हेगारांची माहिती समोर आल्यामुळे पोलिसांनी सापळा रचून हर्सूल परिसरातून दोघांना अटक केली. त्या दोघांच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सिरियल किलर इम्रान मेहंदीच्या टोळीने राष्ट्रवादीचे नगरसेवक, रॉक्सी टॉकीजचे मालक सलीम कुरेशीचा खून केला होता. या खून खटल्याचा निकाल २७ ऑगस्ट रोजी असल्यामुळे इम्रान मेहंदीसह त्याच्या साथीदारांना जिल्हा व सत्र न्यायालयात आणले जाणार होते. न्यायालयात आणल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील नारेगाव रस्त्यावरील जय लहुजी चौकात सापळा रचून ११ जणांना अटक केली. त्या ११ जणांना न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने सरूफ खान शकूर खान (५०, रा. महाराज खेडी, घलटाका चौकी, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्य प्रदेश), नफीस खान ऊर्फ मेवाती मकसूद खान (४०, रा. गोगावा, शहापूर, बिडी मोहल्ला, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी विजयकुमार ऊर्फ आफताब रामप्रसाद चौधरी (३६, बालकेश्वर, ता. किरावणी, आग्रा, उत्तर प्रदेश) याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दिली. तर त्याच्या राहण्याची व्यवस्था अबू चाऊस ऊर्फ मुसा चाऊस साले चाऊस (२६, सईदा कॉलनी, जटवाडा) याने केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला अबू चाऊस हा हर्सूल परिसरात आला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सापळा रचून परप्रांतीय विजयकुमार ऊर्फ आफताब आणि अबू चाऊस या दोघांना ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी कट्टा आणि दहा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि मोबाईल जप्त केला.

परप्रांतीयांवर दोन खुनाचे गुन्हे
विजयकुमार ऊर्फ आफताब हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तर प्रदेश आणि मुंबईत खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एकूण किती गुन्हे आहेत याची माहिती पोलिसांकडे अद्याप प्राप्त झाली नसल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. अबू चाऊस ऊर्फ मुसा हा इम्रान मेहंदी टोळीतील हबीद खालेद चाऊसचा मावस भाऊ असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्यावर परप्रांतीय गुन्हेगारांच्या राहण्याची सोय करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

दोघांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
विजयकुमार ऊर्फ आफताब आणि अबू चाऊस ऊर्फ मुसा चाऊस या दोघांना आज गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तपास अधिकाऱ्यांनी अबू चाऊसने राहण्याची सोय केली. त्या घराची झडती घ्यावयाची आहे, विजयकुमार ऊर्फ आफताब हा हर्सूल कारागृहात राहिलेला असल्यामुळे मेहंदीचे अपहरण करण्यासाठी कट कोणी रचला होता, याची माहिती घ्यावयाची आहे. संभाजीनगरात अन्य कोणी साथीदार आहेत का? याची चौकशी करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली असता न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.