चित्राच्या विश्वात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पनवेलमधील सी.के.टी. कॉलेजच्या वाणिज्य शाखेतील मी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी… कलेची आवड लहानपणापासून असल्याने जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये फाईन आर्ट करण्याची इच्छा आहे. माझी ही आवड माझ्यापर्यंतच सीमित न ठेवता माझ्यासारख्या हौशी लोकांपर्यंत पोहोचावी हे माझं स्वप्न आहे.

कला ही कोणासाठी छंद तर कोणासाठी व्यवसाय असू शकतो, पण माझ्या आयुष्यात कला ही एक अविभाज्य घटक आहे. ही गोष्ट आमच्या शेजारचे आजोबा रमेश घाणेकर यांनी माझ्या लहानपणीच ओळखली होती. अगदी पेन्सिल पकडण्यापासून ते चित्रे रेखाटण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन त्यांनीच केलं. एवढेच नाही तर ही माझी कला वाढावी यासाठी ते मला वेगवेगळी पुस्तके आणून द्यायचे. त्यांच्यामुळेच मी कलेच्या विश्वात आणि कधी रमत गेले माझे मला कळलेच नाही.

आजोबांनी लहानपणापासूनच माझ्यात कलेची आवड निर्माण केल्याने शाळेत कलेकडेच ओढले गेले. तेथे कला हा स्वतंत्र विषय असल्यामुळे मग त्यात वेगवेगळय़ा वस्तू बनवण्याची आवड वाढत गेली. मग कागदी पिशव्या बनवणे, काचेच्या ग्लासवरील नक्षीकाम, खडूवर कोरीव काम करणे या सगळ्यात रमू लागले. अभ्यासातून वेळ मिळेल तेव्हा कलेसाठी वेळ देत होते. काहीतरी वेगळे करण्याचा माझा सतत प्रयत्न असते. मला आजही आठवते ती शाळेत रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यावर शिक्षकांकडून मिळालेली शाबासकीची थाप. ही थाप खरंच खूप प्रोत्साहन देऊन गेली. म्हणूनच मग पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर मेंदी काढणे, घरच्या सण समारंभामध्ये रांगोळय़ा काढणे, पेंटिंग करून फ्रेम्स बनवणं, मित्र-मैत्रिणींसाठी आपल्या हाताने हटके भेटवस्तू बनवणे यातून माझ्या कलागुणांना वाव मिळाला आणि मिळतोय. त्यासाठी माझ्या घरची माणसेही मला खूप प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या कल्पना सुचवत असतात.