
सामना प्रतिनिधी, मुंबई
बारा बलुतेदारांसह महाराष्ट्राची कला-संस्कृती आणि परंपरेचे दर्शन जोगेश्वरीच्या ‘मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’मध्ये मुंबईकरांना घेता येणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या मुंबईतील या पहिल्या शिल्पग्रामचे लोकार्पण महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले.
दिल्लीहाट, हैदराबादचे शिल्पग्राम, सवाई माधवपूर शिल्पग्रामच्या धर्तीवर तब्बल 55 हजार चौरस मीटर जागेवर के पूर्व विभागातील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला लागून असलेल्या पूनमनगर येथील 55 हजार 900 चौ. मीटरचा भूखंड शिल्पग्राम म्हणून विकसित करण्यात आला आहे. पूर्वी मनोरंजन मैदान म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलून त्या जागी शिल्पग्रामचे आरक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अनंत (बाळा) नर आणि आमदार रवींद्र वायकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या शिल्पग्रामचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 22 कोटी खर्च करून हे देखणे शिल्पग्राम साकारण्यात आले आहे. या शिल्पग्रामच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील प्रभू, स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मोहम्मद हलीम खान, उपायुक्त किशोर क्षिरसागर आदी उपस्थित होते.
summary- inauguration of shilpgram by aditya thackeray






























































