आयकर दरात होणार मोठे बदल, 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करात मिळणार सूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुमचे वार्षिक उत्पन्न 20 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला पुढील वर्षापासून आयकरात मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला सादर करणाऱया अर्थसंकल्पातून नागरिकांना आयकर दरकपातीची खूशखबर देणार आहे. त्यानुसार 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के कर आकारला जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही दिवसांत अनेक वेळा आयकर दरात कपातीचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारकडून आयकर दर अधिक सुलभ बनवण्याबरोबरच अनेक उपायांचा विचार केला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के तर 5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जातो. तसेच 10 लाखांपुढील उत्पन्नावर 30 टक्के कर लागू होतो. या दरांमध्ये मोठे बदल होणार आहेत.
n सध्याच्या कररचनेनुसार वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असणाऱया व्यक्तीला आयकर भरावा लागतो. या छोटय़ा करदात्यांनाही दिलासा मिळणार आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे.

प्रस्तावित आयकर दर
वार्षिक उत्पन्न – प्रस्तावित दर
5 ते 7 लाखांपर्यंत – 5 टक्के
7 ते 10 लाखांपर्यंत – 10 टक्के
10 ते 20 लाखांपर्यंत- 20 टक्के
20 लाख ते 10 कोटींपर्यंत – 30 टक्के
10 कोटींहून अधिक – 35 टक्के