
उपनगरी रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासनीसांचा (टीसी) वावर वाढला आहे. यापूर्वी ‘फर्स्ट क्लास’ डब्यातील फुकट्या प्रवाशांवर टीसींचा विशेष वॉच असायचा. सध्या टीसींनी एसी ट्रेनकडे अधिक लक्ष देताना फर्स्ट क्लास डब्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे फर्स्ट क्लास डब्यात फुकट्यांची संख्या वाढली असून आरामदायी प्रवासासाठी जास्त पैसे मोजणाऱ्या पासधारक प्रवाशांचा पुरता हिरमोड झाला आहे.
सणासुदीच्या काळात लोकल ट्रेनच्या द्वितीय श्रेणीतील प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतात. त्यामुळे आम्हालाही रेटारेटी, धक्के सहन करावे लागतात, अशी नाराजी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील फर्स्ट क्लासचे पासधारक प्रवासी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एसी लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर दंडवसुली होत असल्याने रेल्वे प्रशासनाने एसी ट्रेनकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. टीसींना प्रवाशांच्या धक्काबुक्कीचा त्रास सहन न करता ड्युटी करायला मिळत आहे. त्यामुळे एसी ट्रेनमध्ये टीसींची संख्या अधिक दिसत आहे. आधीच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवासी संख्येच्या तुलनेत टीसींचे मनुष्यबळ फार कमी आहे. या अपुऱ्या मनुष्यबळातील अनेक टीसी एसी ट्रेनची ड्युटी करीत आहेत. परिणामी, सामान्य लोकलचा प्रवास विनातिकीट प्रवाशांसाठी मोकळे रान ठरू लागला आहे.
थंड हवा खात ड्युटी … टार्गेटची उद्दिष्टपूर्ती!
अनेक टीसी थंड हवा खात ड्युटी करण्यासाठी एसी ट्रेनमध्ये जातात. या ट्रेनमध्ये वारंवार रेल्वे स्थानकात उतरून डबे बदलण्याचीही गरज पडत नाही. तसेच दंड वसुलीचे टार्गेटही सहज पूर्ण होते, असे एका टीसीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
फर्स्ट क्लास प्रवाशांना एसी ट्रेनमध्ये एण्ट्री द्या!
फर्स्ट क्लास आणि एसी ट्रेनच्या तिकीट दरात जास्त फरक नाही. अशा स्थितीत फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी ट्रेनमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी, रेल्वे बोर्डाने याचा विचार करावा, अशी मागणी नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.