
सामना ऑनलाईन । ठाणे
मुसळधार पावसाने धुमशान घातल्यानंतर आता तुंबलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी डेंग्यू, मलेरियाच्या मच्छरांनी हैदोस घालायला सुरुवात केली असून जिह्याभोवती साथीच्या आजारांचा फास घट्ट झाला आहे. जिह्यात आतापर्यंत टायफॉइडचे 1029, मलेरियाचे 107 तर डेंग्यूच्या 94 रुग्णांची नोंद झाली आहे, तर गॅस्ट्रोचे 139, अतिसाराचे 353 रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे सर्वाधिक 43 रुग्ण आढळले असून दोन जणांचा बळी गेला आहे. पावसाचा लपंडाव असाच सुरू राहिला तर साथीच्या आजारांचा धोका आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेकरांनो सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी अंगावर काढू नका, परिसरात स्वच्छता ठेवा, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
पावसाळा सुरू होताच आजारांचे प्रमाणही वाढायला सुरुवात होते. चिखल, साचलेले पाणी, अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढतात. यामध्ये सर्वाधिक धोका असतो तो डेंग्यू, मलेरियाचा. पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डेंग्यू, मलेरियाच्या अळ्यांची पैदास होते आणि काही दिवसांतच त्यांच्या डंखाने ‘ताप’ वाढतो. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरात डेंग्यू, मलेरिया रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून 30 जूनपर्यंत डेंग्यूचे 94 रुग्ण आढळले आहेत. त्यात ठाणे आघाडीवर असून पालिका क्षेत्रामध्ये सुमारे 43 रुग्णांची नोंद झाली आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये डेंग्यूची लागण सर्वाधिक असल्याचेही आढळून आले असून जून महिन्यात मुंब्रा परिसरातील दोन बालकांना त्यामुळे आपला जीव गमवावा लागला. एकीकडे डेंग्यूचा डंख वाढला असताना टायफॉइड, मलेरियाने सर्वाधिक रुग्ण फणफणले आहेत. टायफॉइडचे आतापर्यंत 1029 रुग्ण आढळले असून जून महिन्यात 259 रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर मलेरियाचे 107 रुग्ण आढळले असून जूनमध्ये 22 जणांना त्याची लागण झाली आहे.
खबरदारी घ्या!
खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी लावा.
घर, गच्ची, परिसरात पाणी साठणार नाही असे पहाके.
पाण्याचा अतिरिक्त साठा करू नये.
पाण्याच्या टाक्यांची झाकणे घट्ट लावा.
खराब टायर, झाडांच्या कुंडय़ा, फुलदाण्या यात पाणी साठणार नाही असे पहाके.
पावसाळ्याच्या काळात पचनशक्ती क्षीण झालेली असते, म्हणून बाहेरील उघडय़ावरचे खाद्यपदार्थ टाळा.
ताप अंगावर काढू नका!
ताप आला तर अंगावर काढू नका, शॉर्टकट म्हणून स्वतःच डॉक्टर बनू नका, अशा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. तीन-चार दिवस सलग थंडी भरून ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठाणेकरांचे पोट बिघडले
ठाणे जिल्हा तापाने फणफणला असताना अनेक रुग्ण पोटाच्या विकाराने हैराण झाले आहेत. जिह्या रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार गॅस्ट्रोचे 139 रुग्ण आढळले असून त्यापैकी 32 रुग्णांची नोंद जूनमध्ये झाली आहे. अतिसाराचे 354 रुग्ण आढळले असून जूनमध्ये 24 रुग्णांची नोंद झाली, तर पावसाळ्यात हगवणचे सर्वाधिक 78 रुग्ण आढळले असून सहा महिन्यांत या रुग्णांची संख्या 319 झाली आहे.





























































